अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार तेजी; निफ्टी 23,530च्या वर, मिडकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी
Stock Market Opening : आज केंद्रीय अर्थसंकल्प-2025 सादर होणार आहे. (Market ) याआधी शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. निफ्टी 23,550 च्या वर पोहोचताना दिसला. मिडकॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली. अर्थसंकल्पापूर्वी बाजारातील भावना मजबूत असल्याचे दिसून आले.
Budget 2025 LIVE : थोड्यावेळात अर्थसंकल्पाचा पेटारा उघडणार; कुणाला काय मिळणार?
अर्थसंकल्पापूर्वी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई) सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या तेजीसह उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्स 104.68 अंकांच्या वाढीसह 77,605.25 च्या पातळीवर व्यवहार करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील 16.25 अंकांच्या वाढीसह 23,524.65 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
कोणते शेअर्स तेजीत?
निफ्टीमध्ये सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सन फार्मा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स तेजीत होते. तर ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, एसबीआय लाइफ आणि नेस्लेचे शेअर्स घसरले. ट्रेडिंगच्या सुरुवातीला रिअल्टी निर्देशांकात 1% पेक्षा जास्त वाढ झाली तर बँका, IT, PSU मध्ये घसरण झाली. एफएमसीजी, मेटल, ऑटोमध्ये मात्र स्थिर व्यवसाय होताना दिसत आहे.
जागतिक संकेत कसे आहेत?
आजच्या व्यवहारात GIFT NIFTY 0.41 टक्क्यांनी घसरत आहे. देशांतर्गत बाजारात मंदीचे संकेत देत आहे. याआधी शुक्रवारी अमेरिकन बाजारातही घसरण दिसून आली. शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 337 अंकांनी घसरला आणि 44,544.66 च्या पातळीवर बंद झाला. तसंच, NASDAQ Composite 54 अंकांनी घसरून 19,627.44 च्या पातळीवर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 31 अंकांनी घसरला आणि 6,040.53 च्या पातळीवर बंद झाला.
बजेटवर ब्रोकरेजचे मत
ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन किंवा सेमीकंडक्टर उत्पादन योजनांचा विस्तार केला जाऊ शकतो. अक्षय ऊर्जा योजनेसाठी निधी वाढू शकतो. आयकर सवलत मिळू शकते. किरकोळ विक्रेते आणि वाहन कंपन्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.