पाकिस्तानला धक्का; सिंधू कराराच्या स्थगितीनंतर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Tender process begins for hydropower project on Chenab river : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी क्षेत्रातील कंपनी एनएचपीसीने चिनाब नदीवरील सावलकोट जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी अधिकृतपणे टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.
रामबन जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे 5,129 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण प्रकल्प एकत्रित पॅकेज अंतर्गत राबवण्यात येणार असून, त्यामध्ये डायव्हर्जन टनेल, अॅडिट्स, डीटी, कोफर डॅम, मांडिया नाला डीटी, संबंधित रस्ते बांधकाम, राईट बँक स्पायरल टनेल, अॅक्सेस टनेल तसेच धरणाशी निगडित सर्व पूरक कामांचा समावेश आहे.
टेंडर प्रक्रिया आणि कालमर्यादा
एनएचपीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठीची बोली प्रक्रिया 12 मार्चपासून सुरू होऊन 20 मार्चपर्यंत चालणार आहे. प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज पूर्ण होण्यासाठी सुमारे 9 वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून
ऊर्जा क्षमतेला मोठी चालना
सावलकोट जलविद्युत प्रकल्पातून तब्बल 1,856 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या वाढत्या ऊर्जा गरजा भागवण्यास मोठी मदत होणार असून, देशाच्या राष्ट्रीय वीज ग्रीडलाही बळकटी मिळणार आहे.
रणनीतिक आणि आर्थिक महत्त्व
सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानातील शेतीचा मोठा भाग अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भारताकडून सिंधू पाण्याच्या वापरासंदर्भात घेतले जाणारे निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानले जात आहेत. पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प भारताच्या रणनीतिक आणि आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चिनाब नदीवरील हा उपक्रम देशातील जलसंपत्तीचा अधिक प्रभावी आणि परिणामकारक वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
