12,000 कोटींपासून भाड्याच्या घरापर्यंत! ‘द कम्प्लिट मॅन’ विजयपत सिंघानिया यांची धक्कादायक कहाणी
विजयपत सिंघानिया यांचे निधन झाले असून यासोबतच भारतीय उद्योगविश्वातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे.
The shocking story of Vijaypat Singhania : रेमंड ग्रुपला जागतिक ओळख मिळवून देणारे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचे निधन झाले असून यासोबतच भारतीय उद्योगविश्वातील एका महत्त्वाच्या पर्वाचा अंत झाला आहे. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत विजयपत सिंघानिया यांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास, यश, संघर्ष, वाद आणि वारसा.
सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून
विजयपत सिंघानिया हे प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबातून आले असले, तरी त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर वेगळी ओळख निर्माण केली. 1980 साली त्यांनी रेमंड लिमिटेडची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि त्यानंतर कंपनीच्या इतिहासात मोठा बदल घडला. त्या काळात रेमंड मुख्यतः ऊनी कपड्यांपुरती मर्यादित होती. पण विजयपत सिंघानिया यांनी विचार केला, फक्त एकाच क्षेत्रात का थांबायचं? आणि इथूनच सुरू झाला विस्ताराचा प्रवास.
त्यांनी सिंथेटिक फॅब्रिक्स, डेनिम, रेडीमेड गारमेंट्स आणि नंतर हाय-प्रिसिजन इंजिनिअरिंगमध्येही कंपनीला उतरवलं. त्यांनी ब्रँडिंगवर विशेष भर दिला. द कम्प्लिट मॅन ही रेमंडची ओळख घराघरात पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंडने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आपली छाप पाडली. आता त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर एक काळ असा होता की विजयपत सिंघानिया यांची नेटवर्थ सुमारे 12,000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात होतं. ते मुंबईतील जेके हाऊस या आलिशान आणि उंच इमारतीत राहत होते.
पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला 2015 साली, त्यांनी रेमंडमधील सुमारे 37 टक्के हिस्सेदारी आपल्या मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे दिली. त्या वेळी या शेअर्सची किंमत 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित दिसत होतं… पण त्यानंतर सुरू झाला एक वाद, ज्याने सर्वांनाच धक्का दिला. माध्यमांच्या अहवालानुसार, एका फ्लॅटच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलामध्ये मतभेद निर्माण झाले. हळूहळू हा वाद इतका वाढला की विजयपत सिंघानिया यांना स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहावं लागलं.
शेतकऱ्यांनो राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस; अलर्ट जारी, जाणून घ्या अंदाज
त्यांनी असा आरोप केला की त्यांच्या मूलभूत सुविधा, घर, गाडी, ड्रायव्हर सुद्धा काढून घेण्यात आल्या. इतकंच नाही, तर चेअरमन एमेरिटस ही पदवी वापरण्यासही त्यांना रोखण्यात आलं. हा वाद उद्योगविश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र या सर्व वादांपलीकडे, विजयपत सिंघानिया यांची एक वेगळी ओळख होती ती म्हणजे एक साहसी व्यक्तिमत्त्व.
त्यांना उड्डाणाची प्रचंड आवड होती. 2005 साली त्यांनी हॉट एअर बलूनमधून 21,000 मीटरपेक्षा अधिक उंची गाठत जागतिक विक्रम केला. ही कामगिरी केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावरही अभिमानाची बाब होती. त्यांनी अनेक एअर रेसमध्ये भाग घेतला आणि भारतात अॅडव्हेंचर स्पोर्ट्सला चालना दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलं. तसेच भारतीय वायुसेनेत मानद एअर कमोडोर ही पदवीही त्यांना प्रदान करण्यात आली होती.
आता त्यांच्या वारशाबद्दल बोलायचं झालं, तर…विजयपत सिंघानिया यांनी फक्त एक कंपनी उभी केली नाही, तर एक ब्रँड तयार केला, असा ब्रँड जो आजही क्लास, क्वालिटी आणि ट्रस्ट यांचं प्रतीक मनाला जातो. आज रेमंड ग्रुप अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे आणि त्याचा पाया त्यांनीच मजबूत केला होता.
शेवटी, त्यांच्या आयुष्यातून आपण काय शिकू शकतो? तर, दूरदृष्टी असेल, तर कोणतीही कंपनी जागतिक स्तरावर नेता येऊ शकते… मात्र त्याच वेळी, वैयक्तिक आयुष्यातील निर्णयही तितकेच महत्त्वाचे असतात. यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवणं जितकं कठीण आहे, तितकंच ते टिकवणंही आव्हानात्मक असतं, आणि विजयपत सिंघानिया यांची कहाणी याचं जिवंत उदाहरण आहे.
आज ते आपल्यात नाहीत… मात्र त्यांनी उभारलेलं साम्राज्य, त्यांची कामगिरी आणि त्यांची ओळख कायम जिवंत राहील.