Video : संसद परिसरात मोठा राडा; राहुल गांधींनी ढकलल्याने भाजप खासदार जखमी

  • Written By: Published:
Video : संसद परिसरात मोठा राडा; राहुल गांधींनी ढकलल्याने भाजप खासदार जखमी

नवी दिल्ली : काँग्रेसपक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. मात्र, या निदर्शनावेळी भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी जखमी झाले असून, विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्याला ढकलल्याने हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप प्रताप सारंगी (Pratap Saranagi) यांनी केली आहे. या घटनेत सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. (BJP MP Pratap Sarangi Injured After Rahul Gandhi Push)

संसद परिसरात नेमकं काय घडलं?

राज्यघटनेचे निर्माते डॉ.आंबेडकर यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत संघर्ष पेटला आहे. गुरुवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारात भाजप आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली, त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले. प्रताप सारंगी यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

घडलेल्या घटनेबाबत बोलताना प्रताप सारंगी म्हणाले की, राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला त्यावेळी मीदेखील खाली कोसळलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिल्याचे सारंगी यांनी म्हटले आहे. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

प्रताप सारंगींनी केलेल्या गंभीर आरोपांवर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “जेव्हा मी संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदारांनी मला धमक्या देत रोखण्याचा प्रयत्न केला. संसदेत जाण्याचा प्रत्येकाला अधिकार असून, आतमध्ये प्रवेश करताना ही घटना घडल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, भाजप खासदारांनी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube