Video : अदानींना आजच अटक करा; अमेरिकेत हालचाली वाढताच राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi Attack on Gautam Adani : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे वादात सापडलेल्या गौतमबाबत राहुल म्हणाले की, अमेरिकन एजन्सीने अदानींना रंगेहाथ पकडले आहे, मात्र भारतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसून, अदानींना आजच अटक करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. अदानींनी 2000 कोटींचा घोटाळा केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पाठिराखे असल्याने अदानींना अटक होणार नसल्याचेही राहुल गांधी म्हणाले. ते दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; यूएसमध्ये लाचखोरी आणि फसवणूकीचे आरोप, अटक वॉरंट जारी
गौतम अदानी यांनी संपूर्ण देशाला हायजॅक केले आहे. घोटाळा होऊनही अदानी तुरुंगाबाहेर का? इथे छोट्या गुन्हेगाराला लगेच तुरुंगात टाकले जाते आणि अदानी इतके दिवस तुरुंगाबाहेर आहे. अदानी यांचे सरकारवर पूर्ण नियंत्रण असून, आम्ही या प्रकरणावर गप्प बसणार नाही. हा मुद्दा संसदेतही मांडणार आहे. अदानी यांनी 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नसल्याचे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले असून, अदानींना आजच अटक करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. भाजप सरकार अदानींना वाचवेल हेही आम्हाला माहीत असल्याचेही ते म्हणाले.
माधवी बुच यांच्यावरही उपस्थित केले प्रश्न
पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधींनी अदानी यांच्यासोबतच माधवी बुच यांचेही नाव घेतले. माधवी बुच यांच्यावर अनेक आरोप करत त्यांनादेखील पदावरून हटवावे अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. बुच या राहुल गांधींना वाचवण्याचे काम करत असून, त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास केलेला नाही. त्यामुळे त्यांना या पदावरून त्वरीत हटवून त्यांचीदेखील सखोल चौकशी व्हावी असे ते म्हणाले.
गौतम अदानी अन् पवारांची भेट कशी झाली? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
‘मोदी-अदानी एक असतील तर सुरक्षित’
राहुल गांधी म्हणाले की, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्र आहेत, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. मोदी सरकार आदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही कारण ज्यादिवशी आदानी तुरूंगात जातील त्यावेळी मोदीही सत्तेतून जातील त्यामुळे सत्तेतील सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींना काँग्रेस शासित राज्यांमध्ये अदानींचे प्रकल्प आहेत त्यावर काय कारवाई अस प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये जर आदानींचे प्रकल्प चुकीच्या पद्धतीने चालवले जात असतील तर त्यांची चौकशी करून ते रद्द केले जातील असे सांगत झारखंडमध्येही हेच आदेश दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.