‘आप’ची काँग्रेसला भन्नाट ऑफर! ‘त्या’ निवडणुकीतून माघार घ्या मग, आम्ही सुद्धा…
AAP : दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) काँग्रेसला एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरची देशाच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. कारण, शक्यतो राजकारणात असे कधी होत नाही जे आम आदमी पार्टीने दिलेल्या ऑफरमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसने (Congress) जर दिल्ली आणि पंजाबात निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला तर आप सुद्धा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आगामी निवडणुकांत लढणार नाही.
पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, की काँग्रेसने जर दिल्ली आणि पंजाबातील निवडणूक लढली नाही तर आप मध्य प्रदेश आणि राजस्थानात निवडणूक लढणार नाही. आम आदमी पार्टीची ही ऑफर अशा वेळी आली आहे जेव्हा केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसचे समर्थन मिळवण्याच्या प्रयत्नात पक्ष आहे.
Ajit Pawar मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत…’ ‘या’ आमदाराने केली भीष्मप्रतिज्ञा
ते पुढे म्हणाले, काँग्रेसला 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत दिल्लीत एकही जागा मिळाली नव्हती. काँग्रेसमध्ये अनेक कमतरता आहेत. त्यामुळे ते आम आदमी पार्टीच्या घोषणापत्राची चोरी करत आहेत. काँग्रेस देशातील सर्वात जुना पक्ष आहे पण, आज हा पक्ष सीसीसी म्हणजे कॉपी कट काँग्रेस झाला आहे. काँग्रेसमध्ये फक्त नेतृत्वच नाही तर विचारांचाही दुष्काळ असल्याचे आता समोर येत आहे. लोकांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत हे माहिती करून घेण्याचे कोणतेच तंत्र काँग्रेसकडे नाही, अशी टीका भारद्वाज यांनी केली.
काँग्रेसने आधी आम आदमी पार्टीच्या मोफत वीज आणि महिलांना मासिक भत्ता देण्याच्या घोषणांची खिल्ली उडविली होती. आता मात्र दुसऱ्या राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतःच अशी आश्वासने देत आहे. काँग्रेसमध्ये निर्णय घेण्यात नेहमीच उशीर केला जातो. यामुळेच ते गोव्यात सरकार स्थापन करू शकले नाहीत. त्याचा फायदा भाजपने घेतला आणि आमदार फोडून सरकारही स्थापन केले, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जर राजकीय पक्षाने निवडणुकाच लढल्या नाही तर त्या पक्षाचेच अस्तित्व तरी काय राहणार. त्यामुळे काँग्रेस ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.