फोटो पोस्ट डिलीट आणि पुन्हा पोस्ट!, सचिन तेंडुलकर आणि राहुल गांधी यांच्या भेटीमागचं रहस्य काय?
सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
What is the secret behind Sachin Tendulkar and Rahul Gandhi’s meeting? : देशातील क्रिकेटचा ‘देव’ मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका छायाचित्राने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राहुल गांधी आणि भाजप यांच्यातील राजकीय दरी वाढलेली असतानाच सचिन तेंडुलकर कुटुंबासह राहुल गांधींना भेटायला गेले. कारण होते मुलगा अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण.
सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनचा विवाह 5 मार्च रोजी सानिया चंडोकसोबत होणार आहे. या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी सचिन पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि होणारी सून सानिया यांना घेऊन राहुल गांधींच्या भेटीस गेले. याआधी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले होते आणि त्या भेटींचे फोटो त्यांनी एक्स X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले होते. मात्र सर्वाधिक चर्चा रंगली ती राहुल गांधींसोबतच्या भेटीची.
फोटो पोस्ट, डिलीट आणि पुन्हा पोस्ट, नेमकं काय घडलं?
या संपूर्ण प्रकरणात वादाचा केंद्रबिंदू ठरला तो एका फोटोचा पोस्ट-डिलीट-रीपोस्ट प्रवास. सचिन तेंडुलकर यांनी राहुल गांधींसोबतचा फोटो प्रथम 10 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:22 वाजता पोस्ट केला. हा फोटो वेगाने व्हायरल झाला आणि काही तासांतच सुमारे 6.27 लाख व्ह्यूज मिळाल्याचा दावा करण्यात आला. यानंतर हा पोस्ट हटवण्यात आला आणि पुन्हा त्याच रात्री 12:19 वाजता तोच फोटो रीपोस्ट करण्यात आला. यामुळे सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले.
केरळ काँग्रेसचा गंभीर आरोप
या घटनेनंतर केरळ काँग्रेसच्या एक्स हँडलवरून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला की, राहुल गांधींसोबतचा फोटो डिलीट करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्यावर दबाव आणण्यात आला. किंग्स मेन इतके घाबरले की त्यांनी सचिनला फोटो डिलीट करायला भाग पाडले. नंतर रात्री 12:19 वाजता तो पुन्हा पोस्ट करायला लावला, जेणेकरून लोक झोपेत असताना राहुल गांधींच्या लोकप्रियतेचा आवाज कमी ऐकू येईल, असा टोला त्यांनी लगावला. मात्र किंग आणि किंग्स मेन यांचा नेमका संदर्भ त्यांनी स्पष्ट केलेला नाही. केरळ काँग्रेसने असा दावाही केला की राहुल गांधींसोबतच्या पोस्टला पंतप्रधान मोदी किंवा राष्ट्रपती मुर्मू यांच्या पोस्टपेक्षा अधिक लाईक्स, शेअर्स आणि एंगेजमेंट मिळाले. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला.
वर्ल्डकपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार; सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
राहुल गांधींसोबतचा फोटो सर्वाधिक वेगाने व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला. पहिला पोस्ट डिलीट करून तोच फोटो मध्यरात्री 12:19 वाजता पुन्हा पोस्ट करण्यात आला. दुपारी 4 वाजेपर्यंत या दुसऱ्या पोस्टला सुमारे 15 लाख व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जाते. तुलनेत राष्ट्रपती आणि अमित शाह यांच्या पोस्टना सुमारे 5 लाख, तर पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टला अंदाजे 10 लाख व्ह्यूज मिळाल्याची चर्चा आहे. या सर्व दाव्यांची अधिकृत पुष्टी किंवा खंडन अद्याप झालेले नाही.
जुने राजकीय संबंध पुन्हा चर्चेत
सचिन तेंडुलकर आणि गांधी कुटुंबीयांचे संबंध नवीन नाहीत. 2013 साली मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारत रत्न देण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी 2012 मध्ये त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले होते. 2014 नंतर सचिन तेंडुलकर राजकारणापासून दूरच राहिले. राहुल गांधींसोबत त्यांची सार्वजनिक छायाचित्रे क्वचितच दिसली. त्यामुळे या भेटीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया
या प्रकरणावर सोशल मीडियावर दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण सचिन यांच्या सर्वपक्षीय शिष्टाचाराचे कौतुक करत आहेत, तर काही जण एका दिवसात राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची अपॉइंटमेंट कशी मिळाली, असा सवाल उपस्थित करत आहेत. सचिन तेंडुलकर यांनी या वादावर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र एका फोटोच्या पोस्ट-डिलीट-रीपोस्टमुळे 2026 मधील राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे. हा प्रकार केवळ तांत्रिक चूक होती की त्यामागे काही मोठी राजकीय कथा दडलेली आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.
बवालिया केरळ काँग्रेस हँडल?
केरळ काँग्रेसचे एक्स हँडल हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय हँडल नसले तरी ते आक्रमक शैली आणि व्यंगात्मक पोस्टसाठी ओळखले जाते. राष्ट्रीय राजकारणावर तीव्र टीका करणाऱ्या या हँडलमुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यांची अति-सक्रियता पक्षासाठी कधी कधी डोकेदुखीही ठरली आहे. एकूणच, क्रिकेट आणि राजकारण यांची भेट झाल्यावर निर्माण झालेला हा वाद अजूनही चर्चेचा विषय ठरला आहे. एका फोटोने उभा केलेला हा राजकीय गोंधळ पुढे कोणते वळण घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
