ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात : ते ५० खोके, ५० आमदारांचाच, तर मी ५० वर्षांचा विचार करतो!
Aditya Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही ‘मी मुंबईकर’ या भावनेने काम करत होतो. आम्ही मेट्रो, कोस्टल रोड असे अनेक प्रकल्प ८५ टक्के पूर्ण केले आहेत. मात्र, त्यानंतर आमचं सरकार पाडून मिंध्ये गटाने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. पण, त्यांनी त्या कामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्यांच्या डोक्यात फक्त ५० खोके, ५० आमदार हे आहे तर आमच्या डोक्यात ५० वर्षांचा विकास आहे, असा टोला ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
मुंबई तक या खासगी वृत्तवाहिनीच्या ‘राजकीय गप्पा’ सत्रात आदित्य ठाकरे हे बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, आमच्या अडीच वर्षाच्या मंत्रिमंडळात मुंबईचे पाच मंत्री होते. सर्वजण एका ध्येयाने विकासकामे करत होते. वरळी-शिवडी रोड, कोस्टल रोड, मेट्रोची काम सुरू केली होती. आमचे सरकार पडेपर्यंत किंवा सरकार पाडेपर्यंत आम्ही ८५ टक्के काम पूर्ण केली होती.
सोडून गेलात ना, आता दुप्पट आमदार निवडून आणणार! ; Aaditya Thackeray यांचे ‘चॅलेंज’ – Letsupp
विकासकामांबाबत आमच्या सरकारचे ५० वर्षांचे व्हिजन होते. तर आता जे सत्तेत आले आहेत. त्यांच्या डोक्यात फक्त ५० आमदार एवढाच विषय असतो. त्यांना मुंबईतील स्केअर फुटाचे रेट माहिती आहे. पण, त्यांना इंच माहिती नाही. त्यामुळे त्यांना मुंबईच्या विकासाचे काही देणंघेणं नाही. त्यांच्या डोक्यात फक्त खोके हाच विषय विषय असतो, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली.
आमच्या काळात कोणत्याही प्रकारच्या विकासकामांना विरोध केला नाही किंवा झाला नाही. केवळ ‘आरे’ येथील कारशेडच्या जागेबाबत आम्ही विरोध केला आहे. त्याचं कारण पण महत्वाचे आहे. आरे येथे जंगल आहे. तेथे मेट्रोचे कारशेड केले तर तेथील जंगल नष्ट होईल आणि मुंबईच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. म्हणूनच आम्ही आरे कारशेडला विरोध केला आहे, असे देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.