तनपुरे भाजपात येताच; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद; जगताप समर्थक नेत्याने थेट तटकरेंवर तोफ डागली

Ahilyanagar MLC election-आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक करण्यासंदर्भाची चांगली हातोटी आहे. सर्वांबरोबर चांगले संबंध असून त्यांच्या कुटुंबीयांचा या जागेवर पहिला हक्क आहे.

  • Written By: Published:
Ahilyanagar Mlc Election

Ahilyanagar MLC election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीची (Ahilyanagar MLC election) घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या वाटेला जाणार आहे. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Congress) नगर जिल्ह्यात नाराजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांचे बंधू माजी जिल्हा परिषद सचिन जगताप हे इच्छुक आहे. ही जागा भाजपला जात असल्याने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नगरसेवक व महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले (Ganesh Bhosle) यांनी तनपुरे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे.

Monsoon Alert 2026: मान्सून महाराष्ट्राला उशीरा व्यापणार ? शेतकऱ्यांना सरकारचा अलर्ट

माजी आमदार स्वर्गीय अरुणकाका जगताप हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकमध्ये दोनदा अपक्ष निवडून आले होते. त्यांना व आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक करण्यासंदर्भाची चांगली हातोटी आहे. सर्वांबरोबर चांगले संबंध असून त्यांच्या कुटुंबीयांचा या जागेवर पहिला हक्क असल्याचे स्पष्ट केले. तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेऊन आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांना उमेदवारी देण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या निवडणुकीत मतदानासंदर्भात वेगळा विचार करतील, असा इशाराही गणेश भोसले यांनी दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी झटत आहे. पक्षातील नेते आपल्या मतदारसंघा पुरतेच मर्यादित राहिले तर पक्षाची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटासारखी होईल होईल, असा टोलाही भोसले यांनी लगावला आहे.

80 तोळ्याचे दागिने लंपास; SBI बँक अधिकाऱ्यांचा कारनामा, शेअर मार्केटने केला घात

अरुणकाका जगताप हे दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत संघटना उभी केली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबीयांचा नैतिक आणि राजकीय हक्क सर्वप्रथम विचारात घेतला गेला पाहिजे. सचिन जगताप यांना उमेदवारी देऊन त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा सन्मान करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीपदाच्या वाटपावरही भाष्य केले. ते म्हणाले की, त्या काळात आमदार संग्राम जगताप यांचा मंत्रीपदावर ठोस दावा असतानाही त्यांना डावलण्यात आले. त्याऐवजी पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपद देण्यात आले. आज ते कोणत्या राजकीय पक्षात आहेत, हे संपूर्ण राज्य पाहत आहे. त्या निर्णयाचे परिणाम आज स्पष्टपणे दिसत असून, निष्ठावंतांना डावलल्यामुळेच पक्षाची काय अवस्था झाली हे आपण पाहत आहोत अशी टीका त्यांनी केली.

भोसले पुढे म्हणाले की, अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे रुजविण्याचे आणि त्याचा वटवृक्ष करण्याचे मोठे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता असलेले, संघर्षशील आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचाही त्यांना मंत्री करण्यासाठी प्रबळ आग्रह होता. मात्र, एका मामाच्या हट्टापायी शेवटच्या टप्प्यात त्यांना डावलण्यात आले आणि कारखानदारीला प्राधान्य देण्याचा निर्णय शरद पवार गटातील नेतृत्वाने घेतला.

त्यांनी आरोप केला की, जनाधार, संघर्ष आणि कार्यकर्त्यांची ताकद एका बाजूला ठेवून वारसाहक्काच्या राजकारणाला महत्त्व देण्यात आले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेचा कौल दुर्लक्षित करून एका “भाच्याला” पुढे केले गेले. आज तोच भाचा सत्तेच्या लोभासाठी भाजपमध्ये जात असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यांच्या आशीर्वादाने राजकीय उंची मिळाली, त्यांच्याच राजकीय भूमिकेला छेद देण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

मंत्रीपद मिळाल्यानंतर मतदारसंघ, पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांसाठी नेमके काय योगदान दिले गेले, याचे उत्तर आजही अनेकांना मिळालेले नाही. सत्तेच्या समीकरणांसाठी पक्ष बदलण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब असून, शरद पवार गटाने कर्तृत्वापेक्षा घराणेशाहीला दिलेले प्राधान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाकडे केलेले दुर्लक्ष यामुळेच त्या पक्षाची आजची अवस्था निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला.

राजकारणात जे पेरले जाते तेच उगवते.
निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आज सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत योग्य न्याय झाला पाहिजे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

follow us