Ajit Pawar Hoarding : ‘महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री अजितदादा’, पोस्टरची सर्वत्र चर्चा

Ajit Pawar Hoarding : ‘महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री अजितदादा’, पोस्टरची सर्वत्र चर्चा

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar )  यांच्या मुख्यमंत्री पदाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  अनेक आमदार हे जाहीरपणे 2024 साली अजितदादांना मुख्यमंत्री करणार, असे बोलत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या (Mumbai )  कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षांतर्गत मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेच सुरु असल्याचे दिसते आहे. महाराष्ट्राचे  भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा”,  अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.

यावर अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. अतिउत्साही कार्यकर्ते अशा काही गोष्टी करत असतात. पण लोकशाहीमध्ये अति उत्साहापेक्षा 145 ही जी मॅजिक फिगर आहे, त्याला जास्त महत्त्व आहे. आता जनता ठरवेल कुणाला 440 चा करंट द्यायचा, अशा फालतू प्रश्नांना उत्तर देऊन मला माझाही वेळ घालायचा नाही, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी तीन नावांची चर्चा असते. अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे ही तीन नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चर्चेत असतात. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या अतिशय जवळचे नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत असते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube