राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळं राजकारण चांगलचं पेटलं. यावररआता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी समस्त ओबीसी समजाचा अपमान केला आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
राज्यातील शाळांच्या वेळा बदलल्या, सरकारकडून जीआर जारी; कसं असणार शाळांचं वेळापत्रक?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा आरोप केला. त्यामुळं भाजपाने त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. भाजपने शुक्रवारी राज्यभर निषेध आंदोलन घोषित केले. तर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नागपूर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा व तालुका केंद्रावर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वा निषेध आंदोलन करणार असल्याची घोषणा आशिष देशमुख यांनी केली. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्यााची माहिती देशमुख यांनी दिली.
राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचाही देशमुख यांनी चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधींनी केलेलं विधान हा त्यांचा उद्दामपणा आहे. त्यांनी समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा आरोप आशीष देशमुख यांनी केला. नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात
ते म्हणाले, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सिफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता.
गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचतेय
देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत ; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.
ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्याचा डाव
अनेक राज्यात कॉंग्रेसने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा कॉंग्रेसने कधीही दिलेला नाही. युपीए -२ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल कॉंग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे, असेही देशमुख म्हणाले.