छगन भुजबळ यांचा सिक्सर : म्हणे उद्धव ठाकरे हेच शिंदे यांना…..

  • Written By: Published:
छगन भुजबळ यांचा सिक्सर : म्हणे उद्धव ठाकरे हेच शिंदे यांना…..

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसून आली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाकडे सर्वांचच लक्ष लागून होतं. काल अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. असाच धक्का ठाकरेंना २१ जून २०२२ रोजी बसला होता. या दिवशी शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली होती. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सुभाष देसाई यांची नावं पुढे केली होती, असा दावा भुजबळांनी केला आहे.

भुजबळ म्हणाले, आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावं पुढे केली होती. भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते. पण सिनियर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय पवार साहेबांनी तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.

दोन हजार कोटींच्या आरोपांवर नरेश म्हस्केंचा पलटवार; म्हणाले, राऊतांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा

यावेळी संजय राऊत यांनी २ हजार कोटींचं डील झाल्याचा जो आरोप केला त्या आरोपांवरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, यावर मला काही जास्त बोलता येणार नाही. पण एक सांगतो की, शिवसेनेतून फुटून ज्यावेळी शिंदेसाहेब आणि बाकी लोक फुटले, त्या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे. कारण, त्यांच्याकडे अशाप्रकारचे व्यवस्थापन कौशल्य आहे, असा टोलाही त्यांनी भाजपला लावला. दरम्यान, यावर आता महाराष्ट्रातील जनता काय म्हणते, हे बघावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे म्हणाले की, जनता ठरवेल कुठली शिवसेना खरी आहे. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहेत. मला वाटतं की, सोशल मीडियामुळे निशाणी आणि नावं सर्वदूर जातं. ज्यावेळी काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा तर सोशल मीडिया नव्हती तरीही पक्ष चिन्ह झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचा उदयही असाच झाला. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. आता जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं? असंही भुजबळ म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube