फडणवीसांचे ‘जलयुक्त शिवार’ जपानलाही भावले, थेट दिली डॉक्टरेट!
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात अनेक महत्वाचे करार होणार आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अशातच आता आणखी एक महत्वाची बातमी जपानमधून (Japan) आली आहे. जपानमधील कोयासन विद्यापीठाने फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे.
डॉक्टरेटनंतर शिंदेना पत्रकारितेची पदवी; कुणाची बातमी छापणार!
कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने फडणवीसांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. याशिवाय जायकाकडून (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळवून विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
महाविकास आघाडीने चौकशी लावली, फडणवीसांनी पुन्हा सुरू केली
याआधीच्या भाजप सरकारच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत राज्यात अनेक कामे झाली. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ झाली. जलसंधारणाचीही कामे झाली. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता ती गावे टँकरमुक्त झाल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानंतर मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली.
तसेच या योजनेतील कामांत गैरव्यवहार झाल्याचे सांगत काही कामांची चौकशीही सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शिंदेंच्या बंडखोरीमुळे भाजपला सत्तेत येता आले. सत्तेत आल्यानंतर सरकारने पहिल्याच झटक्यात बंद पडलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. याच योजनेतील जलसंधारणांची कामे आणि राज्यातील औद्योगिक विकासासाठी केलेल्या कामांची दखल घेत जपानी विद्यापीठाने फडणवीसांनी ही मानद डॉक्टरेट उपाधी दिल्याचे जाहीर करण्यात आले.
Onion Issue : जखम डोक्याला अन् मलम पायाला; केंद्राच्या तोडग्यावर राष्ट्रवादीची टीका