छत्रपती उदयनराजेंसाठी साताऱ्याची वाट बिकटच…!

छत्रपती उदयनराजेंसाठी साताऱ्याची वाट बिकटच…!

‘छत्रपती उदयनराजे भोसले (Chhtrapati Udayanraje Bhosale) लोकसभेसाठी साताऱ्यात भाजपचे (BJP) उमेदवार असणार’ असे वातावरण सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. उदयनराजेंच्या निवासस्थानी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), त्यानंतर भाजपचे समझौता एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) या नेत्यांनी दिलेल्या भेटी, त्यावेळी “तुम्ही तिकीट मागायची गरज नाही आणि आम्ही नाही म्हणायचे कारण नाही” असे त्यांनी उदयनराजे यांना उद्देशून केलेले सूचक वक्तव्य, त्यापाठोपाठ उदयनराजेंचा दिल्ली दौरा. गत आठवड्यात घडलेल्या या सगळ्या घडामोडी या वातावरणाला कारणीभूत ठरल्या.

त्यापाठोपाठ माढ्यामध्ये भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) यांना मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा असणारा विरोध यामुळे ‘साताऱ्याच्या बदल्यात माढा राष्ट्रवादीला देण्याच्या हालचाली’ या बातम्यांनी या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र स्थानिक राजकारणाचा अभ्यास केला तर साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी हा केवळ चर्चेत राहणारा विषय असल्याचे दिसून येते. कसे ते पाहुया सविस्तर…

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना साताऱ्यात राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेली होती. एक उदयनराजे भोसले समर्थक आणि दुसरा उदयनराजे भोसले विरोधक. विरोधी गटाचे नेतृत्व करायचे त्यांचेच बंधू शिवेंद्रराजे भोसले. ग्रामपंचायती, बाजार समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीत जिल्ह्यात या दोघांचीही एकमेकांविरोधात कायम तलवार म्यानातून बाहेरच असायची. उदयनराजे भोसले पक्ष कधीच मानत नव्हते. पक्ष गेला खड्ड्यात, मी म्हणेल तोच पक्ष अशी त्यांची कामाची पद्धत होती. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीवेळी साताऱ्यातील आमदारांचा उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध होता. पण पक्षादेश मानत उदयनराजेंचे काम केले.

2019 च्या निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भाजपवासी झाले. त्यापाठोपाठ उदयनराजेही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्येच आले. त्यामुळे सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी काहीशी अवस्था शिवेंद्रराजेंची झाली होती. पण दोन्ही राजेंना समोरासमोर बसवून भाजप नेतृत्वाने दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि एकत्र काम करण्याचा सूचना दिल्या. आता उदयनराजे भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळाले तर शिवेंद्रराजे भोसले उदयनराजेंचे काम करणार का? हा सर्वात मोठा सवाल आहे.

वेळ आली तर, शिवसेनेतून बाहेर पडणार पण अजितदादांना नडणारचं; शिवतारे बारामतीसाठी ठाम

सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यातील 2004 चा अपवाद वगळता 2009, 2014 आणि 2019 या निवडणुका त्यांनी 60 टक्के किंवा त्याहून अधिक मताधिक्क्याने जिंकल्या आहेत. 2019 मधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सहापैकी फक्त सातारा आणि कोरेगाव याच दोन मतदारसंघात उदयनराजे यांना आघाडी मिळाली होती. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना एक लाख 18 हजार 898 मते तर पाटील यांना 72 हजार 864 मते मिळाली होती. म्हणजे इथून त्यांना 46 हजार 34 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळेच यंदाही उदयनराजे भोसले यांना भाजपचे तिकीट मिळाले तर या मतदारसंघात शिवेंद्रराजे यांची भूमिका महत्वाची ठरु शकते.

कराड आणि पाटण तालुक्याशी नसलेला संपर्क :

उदयनराजे यांना भाजपचे तिकीट मिळाले तरी वाट अवघड असण्याचे दुसरे कारण म्हणजे कराड आणि पाटण तालुक्याशी नसलेला संपर्क. कराड तालुक्यात उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ आहेत. इथे कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे आणि दक्षिणमध्ये अतुल भोसले यांच्यारुपाने भाजपकडे मोठे चेहरे आहेत. तर पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्यारुपाने शिवसेनेचे मंत्रीच आहेत. मात्र त्यानंतर देखील इथून आघाडी मिळविताना उदयनराजे यांची दमछाक होऊ शकते. याचे कारण उदयनराजे भोसलेंचे राजकारण हे सातारा शहरातपुरतेच मर्यादित आहे. कराड-पाटण या दोन्ही तालुक्यांमध्ये उदयनराजे भोसले यांचा जनसंपर्क नाही, असे स्थानिक पत्रकार सांगतात.

याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील हे याच पाटण तालुक्यातून येतात आणि कराडमध्ये वास्तव्याला आहेत. ते आजच्या घडीला 80 वर्षांचे आहेत. मात्र त्यानंतरही मतदारसंघात संपर्क राखून आहेत. ते आजही बोलावले की लग्न, वास्तुशांती, श्राद्ध अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात, मतदारांशी संपर्क ठेवतात. याशिवाय उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बाळासाहेब पाटील आणि दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असे त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते श्रीनिवास पाटील यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहेत.

फडणवीसांशी चर्चा केल्यानंतरच नाराजीचा खुलासा करणार; राम शिंदेंच्या मनात विखेंबाबत अजूनही खदखद!

2019 मधील लोकसभा पोटनिवडणुकीची आकडेवारी बघितल्यास या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. कराड उत्तरमध्ये पाटील यांना तब्बल 50 हजार 879 मतांची सर्वाधिक आघाडी मिळाली होती. तर कराड दक्षिणमध्ये पाटील यांना 31 हजार 849 मतांची आघाडी मिळाली होती. पाटण मतदारसंघाने श्रीनिवास पाटील यांना 27 हजार 859 मताधिक्‍य दिले होते. आता पुन्हा शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना तिकीट दिले तर यंदाही उदयनाराजे भोसले यांच्यासाठी हे तिन्ही मतदारसंघ काहीसे अवघडच असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात.

वाईमध्ये मकरंद पाटलांची पावले पुन्हा शरद पवार गटाकडे वळू शकतात…

उदयनराजे भोसले यांना भाजपकडून तिकीट मिळाले तर वाईमधून आमदार मकरंद पाटील हे निलेश लंके यांच्याप्रमाणे पुन्हा शरद पवार यांच्यासोबत परत येऊ शकतात, असे स्थानिक पत्रकार सांगतात. राष्ट्रवादीकडून अजित पवार गटामधून मकरंद पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांना डावलून उदयनराजे यांना तिकीट दिले वाईमध्ये भाजपचे गणित अवघड होऊ शकते. कारण माजी आमदार मदन पाटील जरी भाजपसोबत असले तरीही त्यांंची ताकद काहीशी मर्यादित झाली आहे. त्यामुळे उदयनराजे यांना आघाडी मिळवायची असल्यास पाटील यांच्या मदतीची गरज त्यांना भासणार आहे.

नुकतेच अजित पवार यांनी मकरंद पाटील यांच्या कारखान्याला कर्जहमी दिली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासाठी साखर पेरणी केल्याची चर्चा आहे. पण तरीही पाटील यांना डावलल्याने तिथला राष्ट्रवादीला मानणारा मतदार नाराजा होऊ शकतो. मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील हे साताऱ्याचे दोन टर्मचे खासदार होते. त्यापाठोपाठ 2009, 2014 आणि 2019 असे सलग तीनवेळा मकरंद पाटील निवडून आले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला मानणारा इथे मोठा मतदार आहे. 2019 च्या पोटनिवडणुकीत वाईमधूनही श्रीनिवास पाटील यांना 27 हजार मतांची आघाडी मिळाली होती. अशात मकरंद पाटील यांनी साथ सोडली तर वाईमध्ये आघाडी मिळविणे हे उदयराजेंसाठी आव्हान ठरु शकते.

कोरेगावमध्ये मिळालेली काठावरची आघाडी चिंतेचा विषय :

2019 मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना अवघ्या पाच हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्याचवेळी विधानसभेला शिवसेनेचे महेश शिंदे हेही केवळ सहा हजार 232 मतांनी विजयी झाले होते. आता महेश शिंदे हे भाजपच्या चिन्हावर उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने आणि शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी देऊन पुन्हा ताकद दिल्याने यंदा महेश शिंदेंचीच विधानसभेची वाट अवघड असल्याचे बोलले जात आहे. याचाच फटका उदयनराजे भोसले यांनाही बसण्याची चिन्हे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube