वेळ आली तर, शिवसेनेतून बाहेर पडणार पण अजितदादांना नडणारचं; शिवतारे बारामतीसाठी ठाम
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय (Ajit Pawar) वाद आता टिपेला पोहोचला आहे. वरिष्ठांनी समज दिल्यानंतरही शिवतारे काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यांनी अजितदादांवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. यावर अजित पवार गटाचाही संयम सुटू लागला आहे. शिवतारे यांची तत्काळ शिवसेनेतून हकालपट्टी करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यानंतर आता शिवसेनेतून खरंच बाहेर पडणार का? शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होणार का? या प्रश्नावर शिवतारे यांनी उत्तर दिलं आहे.
शिवतारे म्हणाले, माझ्यावर कारवाई होणार अशा बातम्या येत आहेत. बघू पुढे काय होते ते. काल्पनिक मुद्द्यांवर बोलणं योग्य होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी लोकसभा निवडणूक लढणार आणि विजयी होणार आहे. आज मी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. महायुतीत मी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जर जागा सोडवून घेतली तर मला आनंद होईल, असे शिवतारे टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
तुम्ही शिवसेना सोडणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आमचं घनिष्ठ नातं आहे. आता दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. परंतु, महायुतीत आपल्यासाठी जागा सुटणार नाही हे देखील ठाऊक आहे. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतो. 25 वर्षांची सोबत आहे ती मात्र कायम राहणार आहे, असे विजय शिवतारे म्हणाले.
अजितदादा बोलतात ते करतातच! आता कोल्हेंचं काय होईल? अनुभव सांगत विजय शिवतारेंचं उत्तर
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख 86 हजार तर भाजपाच्या कांचन कुल यांना पाच लाख 30 हजार मते मिळाली होती. यात पुरंदरमध्ये कांचन कुल यांना 95 हजार 191 मते होती. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या विजय शिवतारे यांना 99 हजार 306 मते होते. म्हणजेच कुल यांच्यापेक्षाही शिवतारे यांना जास्त मते होती. आता शिवसेना फुटली आहे. त्यामुळे शिवसेनेची साधारण 35 ते 40 हजार मते वजा केली तरीही स्वतः शिवतारे यांची किमान 60 ते 65 हजार मते या मतदारसंघात आहेत.