यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन

यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन

विधानसभेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पराभूत होणार? आजच्या घडीला असा विचार कोण करु शकतं? नागपूर (Nagpur) सोडा महाराष्ट्रातही असा विचार करण्याचं धाडस कोणी करणार नाही. जे देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपची (BJP) सत्ता आणण्यासाठी झटतायत, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालत आहेत ते फडणवीस स्वतःच्या होम ग्राऊंडमधील मॅच कशी हरु शकतात? असा सवाल तुमच्यापैकी अनेक जण विचारतील. पण जे काही आकडे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून पुढे येतायत, त्यातून फडणवीस पडू शकतात अशी चर्चा नागपूरमध्ये सुरु झाली आहे. हे आकडे पाहून काँग्रेसमध्येही (Congress) उत्साह संचारला आहे. (fight between BJP’s Devendra Fadnavis and Congress’s Prafulla Gudde in Nagpur South-West Assembly Constituency)

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहू नेमके कोणत्या आकड्यांनी भाजपचे टेन्शन वाढवले आहे…

देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला. 1992 साली नागपूर नगरसेवक झाले. त्यावेळी त्यांचे वय होते 22. 1997 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले, त्यावेळी त्यांना थेट महापौरपदाचीच लॉटरी लागली. अवघ्या 27 व्या वर्षी ते नागपूरसारख्या शहराचे महापौर झाले होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाले. नागपूर पश्चिम मतदारसंघातून त्यांनी त्याकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक धवड यांचा नऊ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. 2004 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांचा त्यांनी 17 हजार मतांनी पराभव केला. 1999 च्या तुलनेत फडणवीस यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली होती.

2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाली. फडणवीस यांच्या पश्चिम मतदारसंघाचा बहुतांश भाग या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघाला जोडला गेला होता. त्यामुळे ते नव्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा 27 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा 58 हजार मतांनी पराभव केला. फडणवीसांच्या मताधिक्यासोबतच भाजपचेही या मतदारसंघातील मताधिक्य वाढले होते.

पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये… ‘कराड दक्षिणला’ अतुल भोसलेंनी ओढत आणलंय…

पण 2014 नंतर चित्र बदलत गेले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून 65 हजारांचे मताधिक्य मिळाले. पण तिथेच देवेंद्र फडणवीस 49 हजारांनी विजयी झाले. फडणवीस यांना एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प भाजपने केला होता. प्रत्यक्षात त्यांना 50 हजारांचे मताधिक्यही गाठता आले नाही. यंदाच्या लोकसभेलाही नितीन गडकरी यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून 33 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळेच भाजपची चिंता वाढली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली होती. यात 370 बुथ प्रमुख, 105 शक्ती प्रमुख, वॉरियर आणि वॉरियरच्यावर सूपर वॉरिअर अशी नेमणूक केली होती. याच यंत्रणेच्या माध्यमातून मतदार याद्यांच्या वाचनाचा कार्यक्रम भाजपने राबवला होता. प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले. अनेकांच्या नावासमोर ‘डिलिटेड’ असा शिक्का मारला होता. त्यामुळे हजारो जणांना मतदानापासून वंचित राहावे लागले. नोंदणी सुरु झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत अगदी बुथ प्रमुख ते पन्नाप्रमुख कोणाच्याच ही गोष्ट लक्षात आली नाही. त्यावरुनच भाजपने थातूरमातूर कामे केल्याचा निष्कर्ष काढत दक्षिण-पश्चिममधील सगळी कार्यकारिणीच बरखास्त केली.

अमृता पवारांचं चॅलेंज, माणिकराव शिंदेंही मैदानात… भुजबळांसाठी ‘येवला’ अवघड?

खरंतर मुख्यमंत्री असताना पश्चिम नागपूरमध्ये सर्वाधिक विकास निधी देण्यात आला होता. दहा वर्षात दोन महापौरही याच मतदारसंघातून दिले होते. हे सगळे केल्यानंतरही सातत्याने भाजपचे मताधिक्य घटत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हे घटते मताधिक्य बघून काँग्रेसचा उत्साहही वाढला आहे. फडणवीस यांच्या विरोधात यापूर्वी निवडणूक लढलेले ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यांनी मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु केला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद, मतभेद मिटल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत लोकसभेमध्ये असलेली राजकीय परिस्थिती कायम राहिल्यास देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवडणूक जिंकणे यापूर्वीच्या तुलनेत सोपे नाही अशी चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube