चूक कबूल करुन माफी मागा! गुणरत्न सदावर्तेंचं उदयनराजेंना प्रत्युत्तर

Gunratna Sadavarte On Udayanraje Bhosle : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात महात्मा फुले वाड्याला भेट देत अभिवादन केलं. यावेळी महात्मा फुलेंच्या कार्याबाबत बोलताना उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलंय. या विधानावरुन आता अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि उदयनराजे भोसले यांच्यात वाद सुरु झालायं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असल्याचा दावा भोसले यांनी केला. त्यावरुन सदावर्ते यांनी भोसलेंना चोख प्रत्युत्तर दिलंय.
उदयनराजे भोसले यांच्या या विधानावरुन अॅड. सदावर्ते यांनी हल्लाबोल चढवलायं. ते म्हणाले, तुम्हाला अभ्यास करावा लागतो. साहित्याचे वाचन करावे लागते. इतिहास वाचावा लागतो. संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात. कोणताही संदर्भ न देता थेट अनुकरण करता. तु्म्ही या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे, असं सदावर्ते म्हणाले आहेत.
तसेच कोण कोणाच्या घरात जन्माला आले हे महत्वाचं नाही. किती अभ्यास झाला यावर भाष्यकार होत असतं. खुलासा करणार नसाल तर तुमची चूक होती हे मान्य केलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?
महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. फुलेंकडे दूरदृष्टी होती. आयुष्यभर कष्ट करुन त्यांनी संपत्ती गोळा केली. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कोणी सुरु केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या वाड्यात केली असल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले.