हातकणंगले : शेट्टींच्या साथीने ‘मविआ’ एकवटली, शिंदे-भाजपचे अजूनही एकमेकांच्या पायात-पाय
राज्यातील शेवटच्या क्रमांकाचा पण सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. कारण राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः किंवा त्यांचे पुत्र प्रतिक पाटील इथून लढणार असल्याच्या चर्चा होत्या. आता होत्या का? तर काँग्रेसच्या सतेज पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी राजू शेट्टी यांना जवळपास महाविकास आघाडीच्या तंबूत दाखल करुन घेतले आहे. शेट्टी महाविकास आघाडीत येणार म्हणजे ती जागा स्वाभाविकरित्या त्यांना सुटणार. यातून एकप्रकारे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना ठाकरे गट आणि काँग्रेसनेचे सुरुंग लावल्याची चर्चा आहे.
एका बाजूला शेट्टींच्या साथीने महाविकास आघाडी एकवटली असतानाच तिकडे भाजप आणि शिवसेनेत मात्र अजूनही एकमेकांच्या पायात पाय टाकणे सुरु असल्याचे चित्र आहे. हा मतदारसंघ कोणाला सुटणार इथपासूनच्या गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत. यात विद्यमान खासदार धैर्यशिल माने हेच लढणार का? लढले तर कोणाकडून? भाजपने कोल्हापूरमधील एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी केल्याने आणि उमेदवारीचा ‘प्लॅन बी’देखील तयार ठेवल्याने नेमकी ही जागा शिवसेनेलाच सुटणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या शोधली जात आहेत.
नेमकी काय आहेत हातकणंगले मतदारसंघातील परिस्थिती, शेट्टी महाविकास आघाडीत कसे आले? भाजप सेना काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून पाहू.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची रचना :
हातकणंगले मतदारसंघ कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्हांमध्ये विभागला गेला आहे. यात कोल्हापूरातील शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे 4 विधानसभा मतदारसंघ आणि सांगलीतील इस्लामपूर, शिराळा या मतदारसंघांचा समावेश आहे.
सध्याची स्थिती काय आहे?
मागील दोन वर्षांपासून नाही-होय, नाही-होय म्हणत आणि मजल दरमजल करत अखेर राजू शेट्टी महाविकास आघाडीत दाखल झाल्याचे चित्र आहे. नुकतेच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. ही भेट उद्योगपती गौतम अदाणी यांच्या त्रासाविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण मूळ उद्देश हा राजकीय संदेश देणे हाच असल्याचे बोलले गेले. त्याचवेळी कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनीही म्हंटले की राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीसोबत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगितले होते.
तिकडे हातकणंगलेमधून लोकसभेसाठी जिल्हाप्रमुख असलेले मुरलीधर जाधव ठाकरे गटाकडून तयारी करत होते. पण ठाकरे-शेट्टींची भेट होताच त्यांच्या तयारीला ब्रेक लागला. त्यांनी या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला. राजू शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आम्ही साहेब पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे. 195 बीपी झाला तरी छाती फुटेपर्यंत आंदोलने केली आहेत, केसेस अंगावर घेतल्या आहेत. मला नको पण सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी द्या, सामान्य शिवसैनिकावर अन्याय करु नका, अशी विनंती त्यांनी केली. पण त्यांचे हेच भाषण व्हायरल होताच अवघ्या दोन दिवसांतच त्यांची जिल्हाप्रमुखपदावरुन हकालपट्टी केली. त्यांच्या हकालपट्टीवरुनच शेट्टी महाविकास आघाडीत येत असल्याचे जवळपास निश्चित झाले.
शेट्टी महाविकास आघाडीत येणे हे काँग्रेससाठी आणि सतेज पाटील यांच्यासाठीही काहीसे फायद्याचे आहे. हातकणंगलेची जागा शरद पवार यांच्या गटाला गेली असती तर इथून प्रतिक पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. प्रतिक पाटील यांचे हातकणंगलेमध्ये येणे म्हणजे एकप्रकारे जयंत पाटील यांची कोल्हापूरच्या राजकारणात अधिकृत एन्ट्री होण्यासारखेच होते. पण आता हातकणंगलेचे समीकरण जुळवून आणल्याने सुंठीवाचून खोकला गेला असा काही सुटकेचा निश्वास पाटील यांनी सोडला असावा. ठाकरे गटासाठी मात्र ही जागा शेट्टींना जाणे यामुळे कोल्हापूरवरील होल्ड घालविण्यासाखरे झाले आहे. एकेकाळी पाच आमदार आणि दोन खासदार अशी सुदृढ अवस्था असलेल्या ठाकरेंना आता कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची शिवसेना शोधावी लागत असल्याचे चित्र आहे.
दुसऱ्या बाजूला मानेंसाठी अजूनही हातकणंगलेच्या लढाईसाठी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपने कोल्हापूरमधील एक मतदारसंघ मिळावा अशी मागणी केली आहे. मग तो हातकणंगले अथवा कोल्हापूर. दोन्हीकडे भाजपची चांगली ताकद आहे. यातही कोल्हापूरमध्ये जास्त. मात्र हातकणंगले वाटणीला आला तर इथे भाजपने प्लॅन ए म्हणून धैर्यशील माने यांनाच उतरविण्याची तयारी केली आहे. तर प्लॅन बी म्हणून माजी खासदार कलाप्पा आवाडे यांचे नातू आणि भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा आहे. स्वतः त्यांनीही निवडणुकीसाठी इच्छा दर्शविली आहे. मागच्या पाच वर्षात भाजपनेही या ठिकाणी हळूहळू आपली राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला आहे.
महाविकास आघाडीची ताकद :
या मतदारसंघांमधील महाविकास आघाडीची सध्याची स्थिती पाहिल्यास शाहुवाडी- पन्हाळ्यातून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच गायकवाड गट मोठे मताधिक्य देऊ शकतात. हातकणंगलेतून काँग्रेसचे आमदार राजू बाबा आवळे आणि माजी आमदार सुजित मिणचेकर तर शिरोळमधून ठाकरे गटाचे उल्हास पाटील यांची ताकद मिळू शकते. याशिवाय इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (UBT) आणि काँग्रेसची मदत बऱ्यापैकी होऊ शकते. इस्लामपूरमधून स्वतः जयंत पाटील, शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची मदत होऊ शकते असे आडाखे बांधले जात आहेत.
महायुतीची ताकद :
शाहुवाडीचे विद्यमान आमदार विनय कोरे हे सध्या भाजपसोबत आहेत. सहकारामुळे कोरेंची पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले या भागात सहकारच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. शिरोळचे एकेकाळचे शरद पवार यांचे समर्थक असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तर इचलकरंजीमध्ये कलाप्पा आवाडे, प्रकाश आवाडे यांची मोठी ताकद महायुतीच्या उमेदवाराला मिळू शकते.
इस्लामपूरमध्ये महायुतीकडे म्हणावा असा तगडा चेहराच नाही. भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही प्रमाणात जयंत पाटील यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अद्यापही सूर गवसलेला नाही. शिंदेंच्या शिवसेनेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. शिराळ्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्यात स्पर्धा असली तरीही ते लोकसभेला एकदिलाने काम करतील असा नेत्यांचा दावा आहे.
मागील तीन निवडणुकांचे निकाल :
2009 :
स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी : 4 लाख 81 हजार 025
राष्ट्रवादी काँग्रेस, निवेदिता माने : 3 लाख 85 हजार 965
शिवसेना, रघुनाथदादा पाटील, 55 हजार 050
2014 :
भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी : 6 लाख 40 हजार, 428
काँग्रेस, कलाप्पा आवाडे : 4 लाख 62 हजार 618
2019 :
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी : 4 लाख 89 हजार 737
शिवसेना-भाजप, धैर्यशील माने : 5 लाख 85 हजार 776