तानाजी सावंत आव्हान पेलणार! भूम-परांडा खेचून आणणार?

तानाजी सावंत आव्हान पेलणार! भूम-परांडा खेचून आणणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेच्या बंडात सगळ्याच चर्चेत कोण राहिले असेल तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत. “देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मी पहिल्यांदा बंडखोरी केली. ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वत: मिळून 150 बैठका घेतल्या. सगळ्या आमदारांचं मन वळवले. जनमताकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हात दाखवणारा मीच पहिला होतो”, असा दावा सावंत करतात. यावरुन राज्याच्या आणि शिवसेनेच्या राजकारणात त्यांचे स्थान किती महत्वाचे आणि मोठे आहे हे लक्षात येते.

आता याच मोठ्या नेत्याला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. पण सावंत यांना पराभूत करणे वाटते तितके सोपे काम नक्कीच नाही. कारखान्याच्या माध्यमातून त्यांना मतदारसंघ बांधला आहे. आरोग्य मंत्री म्हणून काम करताना धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये रेकॉर्डब्रेक निधी दिल्याचा दावा ते करतात. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या या रणनीतीला कितपत यश येऊ शकते? आणि या लढाईत हा विकास आघाडीचा चेहरा कोण असणार हेच बघूया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या विशेष सिरीजमधून….

लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल मतदारसंघात पाहुया काय आहे परांडा विधानसभा मतदारसंघातील स्थिती…

परंडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ. परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांत तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचे अस्त्र.

याच अस्त्राच्या जोरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी आपला प्रभाव तयार केला होता. या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचे नेतृत्व उभे केले आणि घडवले. ते 1985 आणि 1990 असे सलग दोनवेळा ते आमदार झाले. 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. ‘खान पाहिजे की बाण’ या मराठवाड्यातील ढवळलेल्या वातावरणात 1995 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला.

त्याचवर्षी महारुद्र मोटे यांचे निधन झाले. त्यानंतर बरेच वर्ष काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बरेच वर्ष खमके नेतृत्वच मिळाले नाही. 2004 मध्ये शरद पवार यांनी महारुद्र यांचे चिरंजीव राहुल मोटे यांना तिकीट दिले. शांत आणि मितभाषी स्वभाव, वडिलांनी करुन ठेवलेले काम, बाणगंगा कारखान्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं नेटवर्क, शरद पवार यांची ताकद आणि पद्मसिंह पाटील यांची साथ अशी सगळी समीकरणे परफेक्ट बसली आणि मोटे पहिल्याच फटक्यात आमदारही झाले. 2009 आणि 2014 मध्येही मोटे यांनीच बाजी मारली.

राणा जगजितसिंह पाटलांना 90 वर्षांच्या तरुणांच तगडं आव्हान; आमदारकी सोपी नाही!

एका बाजूला मोटे राजकारणात वर जात असतानाच तानाजी सावंत हे या मतदारसंघावर लक्ष ठेवून होते. 2015 मध्ये सावंत यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. सावंत यांना थेट यवतमाळमधून विधान परिषदेचे तिकीट मिळाले आणि ते आमदारही झाले. फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. सावंत यांचाही याच मतदारसंघात भैरवनाथ शुगर्स कारखाना आहे. हेच सावंत यांच्या राजकारणाचे केंद्र. सभासद संख्या 10 हजारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मतदारसंघातील 60 हजार जणांशी तरी त्यांचा थेट संपर्क आहे. याच जोरावर सावंत यांनी मतदारसंघ बांधला. लोकांमधून निवडून येण्याची इच्छा असलेले सावंत 2019 मध्ये या मतदारसंघातून मैदानात उतरले आणि तब्बल 32 हजारांच्या मताधिक्याने विजयी होत आमदारही झाले.

सावंत यांचे काम, धाराशिवमधील त्यांचा साखर कारखाना, मराठवाड्यात असलेली बाळासाहेब ठाकरे यांची क्रेझ या सगळ्याच त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या. यंदा सावंत यांच्यासाठी लोकसभेची निवडणूक वेगळी होती. ओम राजेनिंबाळकर यांना पाडायचंच यासाठी सावंत यांनी मागच्या दोन वर्षांपासूनच तयारी सुरु केली होती. शिवसेनेकडे जागा घेण्यासाठी त्यांनी जीवाचा आटापिटा केला होता. एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांच्या अनेक बैठका पार पडल्या. पण जागा वाटपामध्ये ही जागा अखेरच्या क्षणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली. अजित पवार यांच्याकडे उमेदवार नसल्याने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्यात आले.

खरंतर सावंत यांच्यासाठी हा अचानक आलेला पेपर होता. पण तरीही सावंत यांनी अर्चना पाटील यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार केला. ओम राजेनिंबाळकर यांच्या ‘फोन उचलतो’ या नॅरेटिव्हला तोडून काढण्यासाठी मतदारसंघातील पाच वर्षांचा अॅक्शन प्लॅन जनतेपुढे मांडला. पण अर्चना पाटील यांचा पराभव झाला. यात सावंत यांच्या भूम-परांडा मतदारसंघातही ओम राजेनिंबाळकर यांना तब्बल 81 हजार मतांचे लीड मिळाले. हेच लीडमुळे सावंत यांच्यासाठी विधानसभा अवघड आहे अशा चर्चा सुरु होण्यास कारणीभूत ठरले आहे.

पण या लीडवर विधानसभा निवडणुकीचे गणित मांडणे चुकीचे ठरु शकते असे मत स्थानिक पत्रकार व्यक्त करतात. तानाजी सावंत यांनी कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघ चांगला बांधला आहे. आरोग्य मंत्री म्हणून काम करताना आपण भूम-परांडा मतदारसंघात आणि धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन वर्षांमध्ये रेकॉर्डब्रेक निधी दिल्याचाही त्यांचा दावा आहे. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याला ‘भैरवनाथ इंडस्ट्रीज’कडून एका झटक्यात दहा लाखांची मदत सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात केली होती. त्यामुळे मदतीसाठी कधीही उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे, भाजप आणि स्वतःची यंत्रणा त्यांच्या जोडीला आहे.

Ground Zero : धीरज देशमुखांना रमेश कराड नडणार की पुन्हा पडणार?

याशिवाय तालुक्यामध्ये आणलेले उजनीचे पाणी हा मोठा गेमचेंजर मुद्दा या निवडणुकीत ठरु शकतो. याचे श्रेय तानाजी सावंत यांना द्यावे लागेल, इतके मोठे काम त्यांनी पाण्यासाठी केले आहे. आक्रमक स्वभावामुळे तानाजी सावंत हे नेहमीच चर्चेत असतात. पण हाच त्यांचा आक्रमकपणा मतदारांसाठी उपयुक्त ठरत असतो. तडकाफडकी निर्णय घेत विकास कामांसाठी वेळ आली तर नोकरशाहीलाही दणका देण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे मोठा चाहता वर्ग त्यांचा या मतदारसंघात आहे. काम करणारा नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. हीच प्रतिमा या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार आहे. एकूणच भावनिक मुद्दे की विकासकामे असा मुद्दा आला तर विकासकामे करणारे तानाजी सावंत यांचे पारडे नक्कीच जड राहणार आहे.

यंदा तानाजी सावंत यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार राहुल मोटे यांच्याच नावाची पुन्हा एकदा चर्चा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढलेले शंकर बोरकर हेही इच्छुक आहेत. पण मोटे यांनाच मतदारसंघ सुटू शकतो. यात आता 2024 ची लॉटरी नेमकी कोणाला लागते, कोण बाजी मारते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube