“मी कधीच पक्ष बदलला नाही, तुमचा दादा काम करणारा”; अजितदादांचं विरोधकांना सणसणीत उत्तर
Ajit Pawar : महायुती सरकारमध्ये आल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) अजितदादांनी राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती दिली तसेच अनेक नवीन योजनांची घोषणा केली. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. अजित पवार यांनाही टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आज स्वतः अजित पवार यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत भूमिका स्पष्ट केली आहे तसेच विरोधकांनाही सडेतोड उत्तर दिले आहे. राजकारणात आल्यापासून मी कधीच पक्ष बदलला नाही. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. माझ्यात आणि या लोकांत एकच फरक आहे. त्यांना फक्त राजकारण करायचंय पण तुमचा दादा काम करणारा आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार
महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश या कॅप्शनसह अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. काही दिवसांपूर्वी मी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला अभिमान आहे. आता या अर्थसंकल्पावर अकारण टीका केली जात आहे. काहींनी अर्थसंकल्पाला लबाडा घरचं आवतण म्हणून हिणवलं आहे. मला इतकंच सांगायचं आहे की या लोकांमध्ये आणि माझ्यात एकच फरक आहे. तो म्हणजे त्यांना फक्त राजकारण करायचंय पण तुमचा दादा काम करणारा आहे असे अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
मी राजकारणात कधीच पक्ष बदलला नाही
राजकारणात आल्यापासून मी कधीच पक्ष बदललेला नाही. पार्टी बदलली नाही. जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी नेहमी जनतेच्याच हिताचा विचार करतो. मध्यंतरी माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खोट नाटे आरोप झाले. पण, यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. भविष्यातही कधीच होणार नाही. जो जास्तीत जास्त काम करतो त्यालाच विरोध होतो.
माझा दोष इतकाच आहे की..
मी राज्यातील गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. पण या बदल्यातही मला शिव्या शाप मिळतात. माझा दोष फक्त इतकाच आहे की मी शेतकऱ्यांची दुःखं आणि त्यांच्या वेदना समजून घेतल्या. सरकारच्या योजनांच्या माध्यमातून या वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असेही अजित पवार यांनी सांगितले.