महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला

महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत?  शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला

Meeting Between Eknath Shinde And Devendra Fadanvis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण आलंय. सर्वच राजकीय पक्षांच्या नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे पक्षश्रेष्ठींच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सर्वच पक्षश्रेष्ठी आपापल्या उमेदवारांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत. आमचे सर्व बंडोबा पक्षाचा विचार करतील, अर्ज मागे घेतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात तब्बल चार तास बैठक झाली.

बंडोखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास काल चार तास चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बंडखोरांबाबत चर्चा झाल्याची माहिती टीव्ही नाईन मराठीच्या हवाल्यानुसार मिळत आहे. आज कोणकोणत्या बंडखोर नेत्यांची मनधरणी करता येईल, कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेतील, याबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरु झाली. महायुतीतील बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होता कामा नये, अशी चर्चा त्यांच्यामध्ये झालीय.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. ही निवडणूक सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत जनता कोणाला कौल देते? सर्वसामान्य नागरिकांच्या मनात फोडाफोडीच्या राजकारणाबाबत काय भावना आहे? ते निवडणुकीत बघायला मिळणार आहे.

निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचं एकमेकांना कडवं आव्हान तर आहे. परंतु या दोन्ही पक्षांतील पक्षश्रेष्ठींसमोर आणखी मोठं आव्हान बंडखोरीचं आहे. हे बंड थांबवण्यासाठी दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. पडद्यामागे राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत. आता महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत होणार आणि कोणते बंडोबा माघार घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube