‘भाजप भेकड अन् भ्रष्ट जनता पक्ष, PM मोदी भाकड पक्षाचे नेते’; गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत ठाकरेंनी घेरले
Uddhav Thackeray replies PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली (Lok Sabha Elections) आहे. काल चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्धव ठाकरे आणि (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. नकली शिवसेना म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी पीएम मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, सूर्यग्रहण आणि अमावस्येला यांची सभा होती. असा विचित्र योग देशात पहिल्यांदाच होता. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडून होणार नाही. कालचे भाषण पंतप्रधानांचे नव्हते.
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं
शिवसेनाप्रमुख ज्यांना कमळाबाई म्हणायचे त्या पक्षाला मी भेकड, भाकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. नरेंद्र मोदींचे कालच्या सभेतील भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचे होते. कारण ते अध्यक्षही नाहीत. आता आम्ही सुद्धा यापुढे उत्तर देऊ कृपा करून ते पंतप्रधानांना दिले असे कुणीही समजू नका. आमचे जे विरोधक आहेत त्यात एक भेकड जनता पक्षही आहे. देशातील तपास यंत्रणांचा वापर करून देशभक्त पक्षांना त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. यांच्यात ताकद नाही म्हणून मी ह्यांना भेकड म्हणतो.
पंतप्रधान एका पक्षाचा निवडणूक प्रचार करत असतील तर तो घटनेवर हात ठेऊन घेतलेल्या शपथेचा भंग होतो. त्यामुळेच मला वाटते की नरेंद्र मोदींचे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नेत्याचे होते. भ्रष्ट तितुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए आधी ताकदवान होती परंतु, आता हा ठिगळांचा पक्ष झाला आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.
सांगली शिवसेनेचीच, भिवंडीवरही सोडलं पाणी; जागावाटपाच्या तहात काँग्रेसचं ‘पानिपत’
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाची माहिती दिली. या फॉर्म्युलानुसार शिवसेना सर्वाधिक 21, काँग्रेस 17 आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढणार आहे.
राज्यात काही मतदारसंघात जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली सांगली मतदारसंघाची. तसेच अन्य मतदारसंघांतही थोड्या फार प्रमाणात धुसफूस होतीच. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार देईल याचीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.