Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…

Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…

Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तिखट शब्दांत सरकारला फटकारे लगावले आहेत.

शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यानंतर विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा मी तीव्र निषेध करतो. सत्तेसाठी भाजप आणखी किती खोलवर झुकणार हेच या अटकेवरून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईच्या विरोधीत आता इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे.

केजरीवाल यांना उत्पादन शुल्क प्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांना ईडीने यापूर्वी 9 वेळा समन्स बजावले आहे. मात्र ते चौकशीसाठी हजर होत नव्हते. दरम्यान, ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु उच्च न्यायालयाने अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आज लगेच (21 मार्च) ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराचा काहीवेळ तपास केला. केजरीवाल यांचे दुरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षाही अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यावेळी उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील केजरीवाल यांच्या निवासस्थानाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला होता.अखेर ईडीने दोन तास चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

ईडीच्या या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात सहसंचालक कपिल राज आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. हे राजकीय षडयंत्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहतील. त्यांना तुरुंगातून सरकार चालवावे लागेल तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्री केजरीवालच राहणार आहेत. ईडीने अनेक छापे टाकले, पण एक रुपयाही सापडला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक करण्यात आली. हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया आतिशी मार्लेना यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube