Eknath Shinde : संजय राऊतांचा प्रश्न अन् शिंदेंनी जोडले हात; उत्तर देणेही टाळले..

Eknath Shinde : संजय राऊतांचा प्रश्न अन् शिंदेंनी जोडले हात; उत्तर देणेही टाळले..

Eknath Shinde :  राज्याच्या राजकारणात सध्या अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणारून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचे म्हटले. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर मात्र एक वेगळाच प्रसंग घडला.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला. राऊत यांनी काल नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते, की या सरकारचे काही खरे नाही. सरकार कधीही कोसळू शकते. आता जे चाळीस आमदार भाजपकडे गेले आहेत ते परत येतील पण, एकनाथ शिंदे येणार नाहीत आणि आम्हीही त्यांना घेणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

वाचा : दादा भुसेंना कायमचं गाडण्यासाठी उद्धवसाहेब नाशकात येणार : संजय राऊत

या वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला.  मात्र  मुख्यमंत्री शिंदे यांनी चेहऱ्यावर नकारात्मक भाव आणत हात जोडून या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. या प्रश्नावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच संजय राऊतांनी विरोधकांना घाम फोडला..

दरम्यान, या लाचेच्या प्रकरणामुळे राज्यात राजकारणात गदारोळ उठला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी गटातील नेतेही त्याला प्रत्युत्तर देत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनीही सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामागे कोण सूत्रधार आहे याचा शोध घेतला जाईल. त्यासाठी आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे.  जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.  

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube