एकच पद पण एकाच दिवशी दोन आदेश, दोघांकडेही अतिरिक्त कार्यभार; फडणवीस-शिंदेंचा सुप्त संघर्ष?

Devendra Fadnavis and Eknath Shinde : राज्यातील महायुतीचं सरकार मजबूत असल्याचं सांगितलं जात असलं तरी अंतर्गत धुसफूस आहेच. मंत्र्यांतील सुप्त संघर्ष अनेकदा बाहेर आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील संघर्षही राहून राहून बाहेर येतच असतो. इतकेच नव्हे तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट दिल्ली गाठली आहे. त्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आला. या आदेशावरून दोघांतील संघर्ष तर पुन्हा सुरू झाला नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. मात्र या दोन्ही विभागांकडून एकाच पदासाठी दोन आदेश काढण्यात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आता ही प्रशासकीय पातळीवर चूक झाली आहे की खरंच दोन्ही मंत्र्यांत सुप्त संघर्षाची परिणीती आहे असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
“Dadar Kabutar Khana आंदोलन चुकीचंच, बाहेरच्या लोकांनी..”, मंत्री लोढांनी स्पष्टचं सांगितलं
नेमका आदेश काय होता?
खरंतर डबघाईला आलेली बेस्ट सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशींकडे दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून त्याच पदावर आशिष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. एकाच पदासाठी दोन आदेश निघाल्याने कुणाच्या आदेशाचं पालन करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरविकास खाते असल्याने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या पदावर अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाने याच पदावर आशिष शर्मा यांची नियुक्ती केली. त्यामुळे आता या दोघांपैकी पदभार कोण घेणार की या दोघांऐवजी तिसऱ्याच कुणाला तरी पदभार दिला जाणार याचं उत्तर लवकरच मिळेल.
दरम्यान, बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्हीआर श्रीनिवास 31 जुलैला रिटायर्ड झाले. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीनिवास यांनी काम केले होते. त्यांचा अनुभव पाहता बेस्टचे महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर आता हे पद रिक्त झाले आहे. दोन वेगवेगळ्या आदेशांनंतर आता या पदाची जबाबदारी कुणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.