नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री…विरोधकांची नवी घोषणा

  • Written By: Published:
नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री…विरोधकांची नवी घोषणा

नागपूरः वेगवेगळ्या प्रश्नावरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या घोषणा देण्यात येत आहेत. भूखंड, श्रीखंड, खोके सरकार अशा घोषणा देण्यात येत होत्या. आज विधिमंडळाच्या पायरीवर महाविकास आघाडीतील आमदार हे हातात नागपूरची संत्री घेऊन आले होते. त्यांनी नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री, अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा, अशा घोषणा दिल्या आहेत.

नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या… राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा.. अशा घोषणा दिल्यात. तर संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी आमदारांनी केली. आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशन सुरू झाल्यापासून गेल्या आठ दिवसांपासून वेगवेगळे पध्दतीने विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. कधी वारकऱ्यांच्या वेषात, तर कधी हातात श्रीखंडाचे डबे घेऊन सरकारवर आरोप केले जात आहेत. त्यात घोषणाही दररोज नव्या शोधल्या जात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube