माझा राजीनामा महत्वाचा की संतोष देशमुखांना न्याय? धनंजय मुंडेंचा विरोधकांना थेट सवाल
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.

Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडमधील वातावरण तापलं आहे. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावरही आरोप होत आहेत. या घडामोडी घडत असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगड गाठला. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा केली. यानंतर महंत शास्त्री यांनी मुंडेंना पाठिंबा दर्शवला. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.
53 दिवसांपासून संकट, मला जाणूनबुजून टार्गेट केलं, माझा राजीनामा..धनंजय मुंडेही आक्रमक
काय म्हणाले धनंजय मुंडे ?
‘जे प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय. यात सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आती ही भूमिका मी स्वतःहून मांडल्यानंतरही काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे की स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे.’, असे धनंजय मुंडे म्हणाले.
महायुतीतील काही नेत्यांकडून विधाने होत आहेत. तुमच्यावर आरोप केले जात आहेत असे विचारले असता महायुतीतील जे कोण बोलत आहेत. त्याबद्दल तुम्ही महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारा. मी या विषयावर काही बोलणार नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी, महंत नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट भूमिका; म्हणाले..