सात कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक राज्यपाल अन्.. अजितदादांच्या यादीत आणखी काय?
Ajit Pawar : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) उपस्थितीत होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. तसेच खात्यांवरूनही तिन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळत आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यातच आता अमित शाह यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीत अजित पवार 11 मंत्रिपदांची मागणी करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार सात कॅबिनेट मंत्रिपदांची मागणी करू शकतात. तसेच राज्यमंत्रिपदा आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली जाऊ शकते. याबरोबर कोणत्याही एका राज्यात राज्यपाल पदाची मागणही राष्ट्रवादीकडून केली जाऊ शकते. पक्षातील एखाद्या वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पद आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी अजित पवार यांची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता; संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 41 जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेने 57 आमदार निवडून आणले. संख्याबळाच्या तुलनेत शिंदे गट वरचढ दिसत असला तरी स्ट्राईक रेटच्या बाबतीत दोन्ही गट समान पातळीवर आहेत. कारण अजित पवार यांच्या पक्षाने शिंदे यांच्या तुलनेत कमी जागा लढवल्या होत्या. त्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या आहेत. शिंदे गटाने 81 जागांवर उमेदवार देऊन त्यातील 57 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने 59 जागा लढवून त्यातील 41 जागा जिंकल्या.