मोदींनी डीएमके, टीएमसीला घेरलेच; तामिळनाडू, बंगालमधील महिला व्होट बँक आकर्षित करण्याचा अजेंडा ठरला
Narendra Modi-हे विधेयक मंजूर झाले असते तर तामिळनाडूमधील तमिळ सदस्य वाढले असे सांगत तमिळ जनतेला आपलेसे करण्याचे प्रयत्न केले आहेत.
Narendra Modi On Congress: महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत फेटाळले गेले. ही विधेयक मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश बहुमताची गरज होती. परंतु 54 मते कमी पडल्याने हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर विरोधात 230 मते पडली. विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची आवश्यकता होती. विधेयक मंजूर न झाल्याने भाजपने विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना काँग्रेस, टीएमसी, (TMC) डीएमके (DMK), समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल आणि पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी येथील दोन्ही स्थानिक पक्षावर निशाणा साधत महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. तर तामिळनाडूमध्ये डीएमकेची सत्ता आहे. डीएमकेचे एम. के. स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. या राज्यामध्ये भाजपला म्हणावे तसे यश मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला आठ खासदार निवडून आणता आलेले आहे. या राज्यांमधील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच लोकसभेचे विशेष सत्र बोलून नारी शक्ती वंदन अधिनियम आणण्यात आले होते.
विधेयक मंजूर झाल्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यात येणार होते. तसेच मतदारसंघ पुर्नरचना करून लोकसभा सदस्यांची संख्या साडेआठशेपर्यंत नेणार होते. परंतु हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. हे विधेयक मंजूर न झाल्यास भाजप काँग्रेस, सपा, टीएमसी, डीएमकेवर तुटून पडेल हे स्पष्ट होते.
त्यानुसार आता भाजपने टीएमसी, डीएमके, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला संबोधित करताना सर्व विरोधी पक्षांवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने कायमच सुधारणेला विरोध करत देशाचे नुकसान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. तसेच समाजवादी पार्टी यांनी लोहिया यांचे स्वप्न धुळीस मिळविल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. टीएमसी, डीएमकेला चांगली संधी होती. हे विधेयक मंजूर झाले असते तर तामिळनाडूमधील तमिळ सदस्य वाढले असे सांगत तमिळ जनतेला आपलेसे करण्याचे प्रयत्न केले आहेत.
तसेच महिला विधेयक नामंजूर करून या पक्षांनी महिलांचे नुकसान केल्याचे सांगून महिला मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या प्रचारात आता हा मुद्दा भाजपने सेट केलाय. तसेच उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे या राज्यात भाजपकडून हा मुद्दा प्रचारात येणार हे नक्की आहे.