पृथ्वीराज चव्हाणांची हॅट्रिकची तयारी; अतुल भोसलेंना तिसऱ्यांदा पाणी पाजणार?
पृथ्वीराज चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि आताचे काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते. कराड तालुका हा चव्हाणांचा बालेकिल्ला. पूर्वीच्या कराड लोकसभा मतदारसंघाची खासदारकीही तब्बल 37 वर्षे चव्हाण यांच्याच घरात होती. 1957 ते 1998 या काळात पृथ्वीराज यांचे वडील आनंदराव चव्हाण चारवेळा, आई प्रेमलाकाकी चार वेळा खासदार होत्या. पुढे त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षही झाल्या. स्वत: पृथ्वीराज चव्हाण तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. नाही म्हणायला 1999 साली श्रीनिवास पाटील यांनी चव्हाणांचा पराभव केला. पण त्यानंतरही काँग्रेसने चव्हाणांना ताकद दिली.
चव्हाण राज्यसभेवर खासदार झाले, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. 2014 आणि 2019 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. राज्यात काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ आणि ताकद बाळगून असलेले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे आताच्या काळात चव्हाण यांचा कराडमधून पराभव होऊ शकतो, असे म्हणण्याचे धाडस आज घडीला तरी कोण करणार नाही. असे पृथ्वीराज चव्हाण आता त्यांच्या विधानसभा आमदारकीच्या हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत… (Prithviraj Chavan is all set for his third victory from Karad South Assembly Constituency)
लेट्सअप मराठीच्या या विधानसभा निवडणूक स्पेशल एपिसोडमध्ये पाहू काय सांगतीय कराड दक्षिण मतदारसंघाची परिस्थिती…
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. 1962 पासून इथे एकदाही काँग्रेसचा पराभव झाला नाही. दिवंगत यशवंतराव मोहिते, विलासकाका उंडाळकर हे दोघे इथले यापूर्वीचे आमदार. विलास काका तब्बल 35 वर्षे इथले आमदार राहिले. 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सुरक्षित जागेच्या शोधात होते. त्यावेळी काँग्रेसने विलास काकांचे तिकीट कापले अन् चव्हाण यांना दिले. विरोधात विलास काकांनी बंडखोरी केली. अतुल भोसलेही भाजपमध्ये गेले आणि मैदानात उतरले. मोदी लाट असल्याने काहीही होऊ शकणार होते. वातावरणही तसेच होते. पण चव्हाण 16 हजार मतांनी निवडून आले. 2019 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः तर विजय मिळविलाच. पण सोबत श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभा विजयासाठीही प्रयत्न केले.
आता पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2019 साली महाविकास आघाडीची सत्ता असताना चव्हाण यांच्याकडे कोणतेही मंत्रिपद नव्हते. विधानसभा अध्यक्ष पदासाठीही त्यांचे नाव समोर आले नाही. थोडक्यात मागच्या दहा वर्षांपासून पृथ्वीराज चव्हाण हे फक्त आमदार म्हणूनच त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. पण मतदारसंघात चव्हाण यांची छाप आजही कायम आहे. एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुरोगामी विचार जपणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून महाराष्ट्रात चव्हाण यांना ओळखले जाते.
सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन
चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे हा कराडकरांसाठी आजही अभिमानाचा विषय आहे. मुख्यमंत्री कार्यकाळात जिल्हा होण्यासाठी जी, जी कार्यालय आवश्यक असतात ती ती चव्हाण यांनी कराडसाठी देऊ केली. यात प्रशस्त तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, नवीन आणि सुसज्ज बसस्थानक, अप्पर जिल्हा न्यायालय देऊ केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना स्वतंत्र MH 50 हे वाहन पासिंग दिल्याने कराडला एक ओळख निर्माण झाली आहे. गत साडे सात वर्षात विरोधी पक्षात असून, दहा वर्षांपासून कोणत्याही मंत्रिपदावर नसतानाही भरघोस निधी आणून विकासकामे करण्यासाठी केलेले प्रयत्न, प्रत्येक गावात वाढलेला संपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ घेत तरूण उमेदवारने ठोकला भरणे अन् हर्षवर्धन पाटलांविरोधात शड्डू
अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनीही जुने मतभेद विसरुन चव्हाणांशी जुळवून घेतले आहे. आता उंडाळकर गट सावलीसारखा भक्कमपणे पृथ्वीराज चव्हाण यांच्यामागे उभा आहे. सातारा जिल्हा बँक राजकारणानंतर आमदार चव्हाण आणि उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवली आणि सत्ताही ताब्यात ठेवली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अविनाश मोहिते यांच्या गटाची ताकदही चव्हाण यांच्यासोबत आहे. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड शहरासह मलकापूर भागातील मतदारांवर पकड आहे. शहरासह लगतच्या दहा गावांतही मोठी ताकद आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात संपर्क कायम ठेवला आहे. थोडक्यात विकासकामे आणि संपर्क हीच पृथ्वीराज चव्हाणांच्या यशाची किल्ली असल्याचे बोलले जात आहे.