सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा, पण चुकलात तर…; राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा

  • Written By: Published:
सरकारच्या चांगल्या उपक्रमांना माझा पाठिंबा, पण चुकलात तर…; राज ठाकरेंचा फडणवीस सरकारला इशारा

Raj Thackeray : अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला (Maharashtra) नवा मुख्यमंत्री मिळाला. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आज महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचं अभिनंदन सगळेच अभिनंदन करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) त्यांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण एक इशारा ही दिला आहे.

महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे, मतांची चोरी करून सरकार स्थापन; पटोलेंचा नव्या सरकारवर पहिला वार 

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय असं जर जाणवलं, तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ, असं इशारा राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरेंची जशास तशी पोस्ट –
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.

पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !
राज ठाकरे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरण केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानले. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री, भाजपशासित राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि देशभरातील मान्यवर उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube