… तर थिएटर मालकांनो महागात पडेल, पाकिस्तानी चित्रपटावरून राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray On The Legend of Maula Jatt : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan) ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ (The Legend of Maula Jatt) हा चित्रपट भारतात 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे मात्र या चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कलेला सीमा नसतात पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच थिएटर मालकांनी सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नये असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर पुण्यात देखील हा चित्रपट चालू देणार नाही असा इशारा मनसे चित्रपट सेनाने दिला आहे. ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही.
हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की.
या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 22, 2024
हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं.
561 किमी रेंज अन् ड्युअल सनरूफ फीचर्ससह ‘या’ दिवशी लाँच होणार Kia EV9
मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.