‘रोहित पवार म्हणजे डोक्यावर उलटा पडलेला अन् मड्यावरच्या टाळूचं लोणी खाणारा माणूस’, राजेंद्र राऊतांची जहरी टीका
Rajendra Raut on Rohit Pawar: भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली आहे.
Rajendra Raut on Rohit Pawar: भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचा राजेंद्र राऊत यांनी समाचार घेतला. रोहित पवार हे केवळ राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.
राजेंद्र राऊत म्हणाले, “रोहित पवार हा डोक्यावरती उलटा पडलेला माणूस आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अपघातामागे असलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत आहेत, असा थेट आरोप करणं म्हणजे स्वतःचं राजकीय अस्तित्व वाढवण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न आहे. मुळातच अजितदादांची जागा मला कशी मिळेल, याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत. मी तर म्हणेन, मड्यावरच्या टाळूचं लोणी खाणारा माणूस म्हणजे रोहित पवार.”
पुढे बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या राजकीय भूमिकेवरही निशाणा साधला. “एक तर रोहित पवारांना घरात काय किंमत नाही. ते काँग्रेसच्या वाटेवर चाललेलं पिल्लू आहे,” अशी बोचरी टीकाही राजेंद्र राऊत यांनी केली.
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले ! पाच महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील प्रत्येक विषयाला विरोध करून आपणच राज्यातील विरोधी पक्षनेते आहोत, असे भासवण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. “राज्यात कोणताही विषय असला की त्याला विरोध करायचा आणि मीच राज्यातला विरोधी पक्षनेता आहे, असं लोकांना भासवायचं. त्यामुळे रोहित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही राजेंद्र राऊत यांनी दिला.
ते ‘मफलर मॅन’ फडणवीस; अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातावरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता राजेंद्र राऊत यांच्या टीकेमुळे या वादाला आणखी धार आली आहे.