‘समता’ च्या दबावातून भुजबळांचं प्रेशर पॉलिटिक्स; मंत्रिपदाचा राजीनामा की नुसतीच पोकळ हवा?
मुंबई : छगन भुजबळ यांच्यासोबत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल (दि.17) बैठक पार पडली. मुंबईच्या वांद्रे येथे पार पडलेल्या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज अद्यापपर्यंत आलेला नाही. पण कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर भुजबळांवर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचा दबाब असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ राज्यसरकामध्ये असलेल्या मंत्रिपदाचा त्याग करून जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Chhagan Bhujbal Pressure Politics With Samata Parishad)
लोकसभेनंतर राज्यसभेलाही डावललं
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भुजबळ नाशिकमधून निवडणुक लढवण्यास इच्छूक होते. त्यांना दिल्लीतून तयारीला लागा असेही सांगण्यात आले होते. पण दिवसांचा कालावधी उलटूनही त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने अखेर भुजबळांनी लोकसभेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तयारीला लागा असे सांगूनही भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात होते.
त्यानंतर प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही ते उत्सुक होते. पण लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पक्षानं संधी दिली. त्यामुळे भुजबळांची नाराजी वाढली आहे.
पक्षात भुजबळांची कोंडी वेगळा निर्णय घेण्याची मागणी
लोकसभा आणि राज्यसभेला भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळांसह समता परिषदेतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच काल मुंबईत समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात पक्षात होत असलेली भुजबळांची कोंडी पाहता समता परिषदेकडून भुजबळांवर दबाव आणला जात असल्याचं बोललं जातं. त्यामुळे भुजबळ काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, समता परिषद भुजबळांची संघटना आहे. त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून भुजबळ प्रेशर पॉलिटिक्स तर खेळत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.