आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात?

आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात?
Sangli Loksabha Election News :  आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress) 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
सांगली मतदारसंघातून (Sangli Lok Sabha seat) काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे ते या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सांगलीचा तिढा आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. माहितीनुसार उद्या सांगली काँग्रेसची बैठक होणार असून यानंतर पुढचा निर्णय होणार आहे.
आमचं चुकलं काय? सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल 
दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल झाले आहे.  आमचं चुकलं काय? आता लढायचं अशा स्वरुपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विशाल पाटील मोठा निर्णय घेत अपक्ष निवडणूक लढवणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी मधील घटकपक्ष काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद होत होते. मात्र आता जागावाटपामध्ये ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून या आता सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) लढवणार आहेत. त्यामुळे आता विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
उद्या सांगली काँग्रेसची बैठक
लोकसभेसाठी जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता उद्या सांगली काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे.  विश्वजीत कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असं शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं. मात्र अंतीम निर्णय विशाल पाटील घेतील. उद्या 11 वाजता बैठक पार पडणार असल्याचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज