आम्ही वाट बघतोय, घुसा आणि परत जाऊन दाखवा; राऊतांचे गुलाबरावांना थेट आव्हान
Sanjay Raut on Gulabrao Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे सभेच्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरे हे पाचोरा येथे कै. आरव तात्या यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत आहेत. उद्धवजींचे व आरव तात्यांचे संबंध जवळचे होते. त्यामुळे उद्धवजी येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पण जर माझ्यावर संजय राऊत सारखा माणूस बोलेल तर मी त्या सभेत घुसेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तसेच मी उद्या यासंदर्भात एसपींना निवेदन देखील देणार आहे. त्यांनी चौकटीत बोलावं अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेल अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी राऊतांना सज्जड दम दिला आहे.
Sanjay Raut : अग्रलेखात चुकीचे लिहिले ते अजितदादांनी सिध्द करावं
यानंतर राऊतांनी देखील तितक्याच जोरदारपणे गुलाबराव पाटलांना उत्तर दिले आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय. सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊतांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जळगावच्या सभेआधीच शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. याआधी त्यांनी खेड व त्यानंतर मालेगाव येथे सभा घेतली होती. तसेच महाविकास आघाडीचा वज्रमूठ सभा देखील सुरु आहे. त्यामुळे या सभेत ठाकरे गटाची तोफ गुलाबराव पाटलांवर धडकणार हे नक्की मानले जात आहे.