गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे टपोरी लोकं, ते फक्त खोके घ्यायला…; संजय राऊतांची सडकून टीका
Sanjay Raut On Girish Mahajan : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला अनेकदा अल्टिमेटम देऊनही आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत मराठा वादळ मुंबईत येऊन धडकलं आहे. मुंबईत आल्यावर सरकारची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. जरांगे पाटील मुंबईत पोहोचताच सरकारने पुन्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चाही केली. त्यात काही महत्वाचे निर्णय झाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) सरकारवर जोरदार टीका केली.
नितीश कुमारांचं ठरलं! RJD ला धक्का देत ‘या’ दिवशी JDU-BJP सरकारचा शपथविधी ?
आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी मंत्री गिरीश महाजन, अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी कोणाचे शिष्टमंडळ पाठवता? गिरीश महाजन, अर्जुन खोतकर हे टपोरी लोक आहेत. ते खोके घ्यायला चांगले आहे. पण, आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी, ते प्रश्न सोडवण्यासाठी असे लोक कामाचे नाहीत. त्यासाठी जाणकार लोकचं पाहिजेत. सरकारने विरोधी पक्षनेते, गटनेते आणि जाणकारांचे शिष्टमंडळ तयार करून ते जरांगे पाटलांकडे पाठवलं पाहिजे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्वत: जरांगे यांच्याशी चर्चा करावी. मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन जरांगेंशी चर्चा करावी. हे कोणत्याही एका पक्षाचे काम नाही, सर्व पक्षांनी मिळून ते केलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
यावेळी राऊतांना भाजपवरही सडकून टीका केली. दंगल घडवून आणण्याची भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. 400 पारचा नारा हा दंगलीच्या आगेतून सुरू झालेला नारा आहे. अबकी बार 400 पार, हिंदू-मुस्लिमांचे प्राण घेऊन 400 पार करायचं आहे का, असा बोचरा सवालही राऊतांनी केला.
संजय राऊतांना इंडिया आघाडीविषयी विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा फॉर्म्युला शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. वंचित बहुजनचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी सर्व पक्षांतील मान्यवरांनी चर्चा केली. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, एखाद्या जागेवरून मतभेद झाले असतील तर काही नाही… देश वाचवायला हवा. संविधान वाचले पाहिजे, अशी भूमिका मविआची आहे. आणि तीच भूमिका आबेडकरांचीही आहे. त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन पुढं जाणार आहोत. आम्हाला भाजपला हरवायचं आहे. आमचं भांडण कॉंग्रेसशी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत जरांगेंचा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारी शिष्टमंडळाने आज जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. मात्र जरांगे यांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.