Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच लागले कामाला, शिक्षणमंत्र्याकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची (MLC) शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात मिळवलेल्या विजयानंतर त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर सत्यजित तांबे लगेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेवून त्यांच्याकडे शिक्षकांच्या मागण्या मांडल्या आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन विनाअनुदानित शिक्षकांना शाळा तपासणीची अट न ठेवता तातडीने अनुदान द्यावे व वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ व्हावी यासाठी निवेदन पत्र दिले. तसेच, जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चेसाठी भेटण्यास वेळ देण्याची विनंती केली. pic.twitter.com/HqXhVXAVaw
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 8, 2023
सत्यजित तांबे यांनी पत्र लिहून मागणी केली आहे की, “राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबत व शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले, हे दोन अतिशय चांगले निर्णय घेतले त्याबद्दल आपले आभार. परंतु विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय काढताना त्यामध्ये शाळांना पुन्हा तपासणीची अट घातलेली आहे मुळातच या अगोदर देखील अनेक वेळा या शाळा, वर्ग व तुकड्यांची तपासणी झालेली असून ही अट काढून सर्वांना अनुदान सुरू करावे. तसेच शिक्षण सेवकांचे मानधन आपण वाढविले परंतु येथून पुढे शिक्षण सेवकांचे मानधनात बाढ ही महागाई निर्देशांकानुसार आपोआप व्हावी.”
यासोबत त्यांनी शिक्षणाचे इतरही अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यामध्ये जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न हा अत्यंत गांभीर्याचा असून त्यासाठी आपण मला चर्चेसाठी वेळ द्यावी, अशी विंनतीही दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.