बारामतीचे पार्सल परत पाठवा, विखेंचे आव्हान… त्याला रोहित पवारांचे थेट उत्तर
अहमदनगर : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आज भाजपकडून कर्जतमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थेट आमदार रोहित पवार यांच्यवा निशाणा साधला. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बारामतीचे पार्सल परत पाठवा असे आवाहन विखे यांनी कर्जतकरांना केले आहे. विखेंच्या याच वक्तव्याला आमदार रोहित पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांचे उदघाटन, शुभारंभ यासाठी कर्जत शहरात आले होते. यावेळी कर्जतमध्ये आयोजित सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांनंतर विखेंच्या वक्तव्याला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.
रोहित पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तर ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून मला आणि माझ्या मतदारसंघाला खूप अपेक्षा आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पार्सल परत पाठवण्याचं आवाहन त्यांनी कार्यक्रमात केल्याचं मला काही जणांनी सांगितलं. पण विखे पाटलांचे आजोबा आणि माझ्या आजोबांचे त्यांच्या काळापासून खूप चांगले संबंध होते.
तेंव्हापासून दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखतात. त्यामुळं त्यांनी पार्सल परत पाठवण्याचं केलेलं आवाहन ऐकूण मला विधानसभेच्या निकालानंतर विखे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांची आठवण झाली. त्यामुळं ते कुणाबाबत बोलले हे उघड गुपित आहे. याबाबत मला काहीही बोलायचं नाही.
हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार, कालीचरण महाराजांचे परखड वक्तव्य
पण माझ्या विकासाचं ३०० कोटी रुपयांहून अधिक मोठ्या विकास कामांच्या जंबो पार्सलला या सरकारने स्थगिती दिली आहे. ती उठवण्यासाठी पालकमंत्री म्हणून विखे पाटील आपण मला मदत करावी, अशी माझी त्यांना विनंती आहे, असे रोहित पवार म्हणाले आहे.
शाळेत खोटा इतिहास शिकवला जातोय, शिक्षण पद्धतीवर कालीचरण महाराजांची टीका
तसेच पुढं बोलताना पवार म्हणाले, दुसरं म्हणजे मतदारसंघात भूकंप होणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळं मतदारसंघाची काळजी घेणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य असल्याने मी मतदारसंघात लक्ष ठेवून होतो. पण कुठेही कोणतंही नुकसान झालं नाही आणि माझा कर्जत-जामखेड मतदारसंघ संपूर्ण सुरक्षित आहे आणि इथली जनता ही माझ्यासोबत आहे. मग विरोधकांकडून कोणत्या भूकंपाचा दावा केला जात होता? असा प्रश्न मला पडलाय.