बारामतीत बोगस मतदान, शर्मिला पवारांचा आरोप, अजितदादांनी केले आरोपाचे खंडन
Baramati Vidhansabha : बारामती (Baramati) मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे. दमदाटी करून मतदान करून घेतलं जात आहे. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते, असं शर्मिला पवारांनी सांगितलं. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
बारामतीत एकही बोगस मतदान झाले नाही, माझे पोलिंग एजंट धमकावण्याची भाषा करणार नाहीत, असं अजितदादा म्हणाले.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. बारामतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोलतांना शर्मिला पवार म्हणाल्या की, माझ्यासमोर एका व्यक्तीने मतदान केंद्रावर दमदाटी केली. तो जणूकाही स्वत:च्या घरचे लग्न असल्यासारखे या, बसा वगैरे सांगत होता. खाणाखुणा करून मतदारांशी बोलत होता. काय संकेत देत होता माहिती नाही. आम्ही आक्षेप घेतला आणि तसे न करण्याची विनंती केली. आमचा मोहसीनही त्यांना तेच सांगत होता. मात्र त्यांनी त्याला धमकावले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढले.
बारामतीत बोगस मतदान, शर्मिला पवारांचा आरोप, अजितदादांनी केले आरोपाचे खंडन
शर्मिला पवार म्हणाल्या, ते कोणाचे कर्मचारी होते, माहिती नाही. पण नक्कीच घड्याळाचे होते, हे मी सांगू शकते. मी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आहे. आता सीसीटीव्ही फुटेजही डिलीट होण्याची भीती आम्हाला वाटत आहे, असं शर्मिला पवार म्हणाल्या.
अजितदादांनी फेटाळले आरोप…
अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. आमची विचारधारा शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. आम्ही कधीही असं करणार नाही. मला माझ्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझे पोलिंग एजंट धमकाववण्याची भाषा वापरणार नाही. तसेच, तक्रार दाखल झाल्यास पोलिस आणि निवडणूक आयोग त्यावर कारवाई करेल. केवळ तक्रारीला काही अर्थ नाही. त्यात काही तथ्य असेल तर त्याला अर्थ आहे, असं अजितदादा म्हणाले.