नेवासामध्ये भाजपची ‘शांतीत क्रांती’; आमदारकी वाचवण्यासाठी गडाखांचा प्लॅन काय?
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिले ते ठिकाण म्हणजे नेवासा. याशिवाय श्रीश्रेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, वरखेडची महालक्ष्मी असे तीर्थक्षेत्र असलेला मतदारसंघ म्हणजे नेवासा. हा तालुका पूर्वी दोन मतदारसंघात विभागला गेला होता. नेवासा-नगर आणि नेवासा-शेवगाव असे मतदारसंघ होता. 2009 नंतर नेवासा (Nevasa) तालुकाच एक मतदारसंघ तयार झाला आहे. तेव्हापासून दोनवेळा या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांचे पुत्र शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) हे निवडून आले आहेत. तर एकावेळी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखांना धक्का दिलेला आहे. आता यंदा या मतदारसंघाचे चित्र कसे असणार आहे? भाजपकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरविला जाऊ शकतो? गडाख कोणत्या पक्षाकडून लढतील? की पुन्हा अपक्षच रिंगणात उतरतील? (Shiv Sena (UBT)’s Shankarao Gadakh and BJP’s Balasaheb Murkute may face a fight in Nevasa assembly constituency.)
पाहुया लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधील या व्हिडिओमधून…
नगर-नेवासा मतदारसंघ असताना इथे स्वर्गीय दादापाटील शेळके, शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व राहिले. पण पुर्नरचना झाल्यानंतर नेवासा हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 च्या पहिल्याच निवडणुकीत जिल्हा बँक, मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करणारे शंकराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर मैदानात उतरून आमदार झाले. गडाख यांनी 91 हजार 429 मते घरात आमदारकी आणली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या विठ्ठलराव लंघे यांचा वीस हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. लंघे यांना 69 हजार 943 मते मिळाली होती.
मुळा साखर कारखाना, शिक्षणसंस्था, बाजार समित्या, पंचायत समित्या, दूध संघ अशी सगळी सत्ताकेंद्र गडाख यांच्या ताब्यात असतानाही 2014 मध्ये या मतदारसंघात भाजपची हवा चालली. विठ्ठलराव लंघे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होऊन जिल्हा परिषद सदस्य झाले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यामुळे गडाख यांना कट्टर राजकीय विरोधक मतदारसंघात राहिला नाही. पण भाजपने येथून बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर डाव खेळला आणि तो यशस्वी झाला. मुरकुटे यांनी शंकरराव गडाख यांचा सहा हजार मतांनी पराभव केला. गडाख यांना 79 हजार 911 मते मिळाली होती. तर बाळासाहेब मुरकुटे यांना 84,570 मते मिळाली होती. तेव्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. परंतु इतर उमेदवारांना पाच हजारांच्या आताच मते मिळाली.
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग… शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?
2019 च्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. ते थेट क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून अपक्ष म्हणून निवडणुकीचा रिंगणात उतरले. बॅट हे त्यांचे चिन्ह होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पुरस्कृत केले होते. भाजपने पुन्हा मुरकुटेंना तिकीट दिले. पण या निवडणुकीत गडाखांनी बाळासाहेब मुरकुटे यांचा तब्बल 23 हजार मतांनी पराभव केला. गडाखांना 1 लाख 16 हजार 943 मते मिळाली होती. तर मुरकुटे यांना 86,280 मते मिळाली होती.
निवडून आल्यानंतर गडाख यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा न देता शिवसेनाला पाठिंबा दिला. त्यावेळी त्याची मोठी राजकीय चर्चा झाली. पण त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांनी गडाखांना थेट कॅबिनेट मंत्री केले. त्यांच्याकडे जलसंधारण हे महत्त्वाचे खाते दिले. तसेच धाराशिवचे पालकमंत्रीपदही दिले. पहिल्यांदा गडाखांना दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्रिपद मिळाले. त्या काळात त्यांनी नेवासा मतदारसंघात जलसंधारणाचे अनेक प्रकल्प मार्गी लावल्यामुळे त्यांची पाणीदार आमदार अशीच ओळख निर्माण झाली.
यंदा ही जागा महायुतीमध्ये शंकरराव गडाखांसाठी तिन्ही पक्ष सोडतील. पण प्रश्न आहे गडाख कोणत्या चिन्हावर लढतील. ते गेल्या वेळीप्रमाणेअपक्ष रिंगणात उतरणार का? यावर अद्याप त्यांनी कोणत्याही भूमिका जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे हे शनिशिंगणापूरला येतात. ते थेट गडाखांच्या घरी पाहुणचारही घेतात. त्यामुळे यंदा ते मशालीवर निवडणूक लढवू शकतात.
अमित देशमुखांना ‘देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?
तर महायुतीमध्ये भाजपचा या जागेवर पक्का दावा आहे. भाजपमधून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येताच उत्तरेचे जिल्हाध्यक्ष झालेले विठ्ठलराव लंघे हे दोघेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. तर बाळासाहेब मुरकुटे यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे दोघापैकी गडाखांच्या फाइटला कोण आहे ते तिकीट वाटपाच कळेल. शिवाय शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी मागणीही सेनेचे कार्यकर्ते करत आहेत.
यंदाच्या निवडणुकीत नेवासामध्ये गडाख यांच्या व्याहाची म्हणजेच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची भूमिका काय असणार हेही बघणे गरजेचे आहे. घुले यांची कन्या डॉ. निवेदिता घुले आणि गडाखांचा मुलगा उदयन गडाख यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे. या मतदारसंघामध्ये चंद्रशेखर घुले यांचा भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी कारखाना आहे, त्यांच्या शिक्षणसंस्था आहे, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नेवासा मतदारसंघातील अनेक गावे आहेत. गडाखांचे व्याही हे सध्या अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे घुलेंच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.