अमित शाहांनी बीड, परभणीवर बोलायला हवं होतं, पण ते हेडलाईनसाठी पवारांवर…; सुळेंची खोचक टीका
Supriya Sule on Amit Shah : शिर्डीतील भाजपच्या (BJP) राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, अशी टीका शाह यांनी केली. दरम्यान, अमित शाह यांच्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिलं.
हुश्श! चीनमधून दिलासादायक बातमी; HMPV परतीच्या मार्गावर…
सुप्रिया सुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अमित शाहांनी केलेल्या टीकेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, एवढं यश त्यांना मिळालं असलं तरीही महाराष्ट्रात आल्यावर त्यांना हेडलाईनसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलावंच लागतंय. त्यांनी निश्चितच टीका करावी. पण त्याचबरोबर या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी फक्त सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर महाराष्ट्राच्या जनतेला थोडासा आधार मिळाला असता, असं सुळे म्हणाले.
पुढं त्या म्हणाल्या की, बीडच्या प्रकरणात आम्ही राजकारण आणलेलं नाही, आणणार नाही. सुरेश धस यांनी बीडच्या बदनामीचं राजकारण केलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मात्र, मी त्यांना सांगू इच्छिते की, ही बीडची बदनामी नाही. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. वाल्मिक कराडची कृत्य राक्षसी आहे. सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया या सर्वांनी हे प्रकरण उचलून धरलं. कारण, हे कृत्य अमानवीय आहे. आम्ही वाल्मिकी कराड नाही, तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत, असं त्या म्हणाल्या.
‘आकां’चे आका मुंडे, अन् ‘सरताज’ देवेंद्र फडणवीस, अंधारेंनी नवीन शोध लावला…
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू -फुले-आंबेडकरांचा आहे. इथे खून, बलात्कार, अन्याय आणि अत्याचार होत असताना आम्ही गप्प का राहावे? असा सवालही सुळेंनी केला.
अमित शाह नेमके काय म्हणाले?
शिर्डीतील अधिवेशनात बोलतांना शाह म्हणाले, शरद पवार यांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिध्दांताला सोडलं होतं. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र, नंतर तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शाह यांनी केली.