महाविकास आघाडीतील तीन ‘लेडी बॉस’; महाराष्ट्रात ठरणार गेमचेंजर?

महाविकास आघाडीतील तीन ‘लेडी बॉस’; महाराष्ट्रात ठरणार गेमचेंजर?

अमेरिकेच्या राजकारणात ‘पॉलिटिकल क्लाऊट’ अशी एक प्रसिद्ध टर्म आहे. या शब्दाचा अर्थ होतो, राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव. याच टर्मला धरुन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितले तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे. पण या सगळ्यांच्या यादीत महिला नेत्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही काही अशा महिला नेत्या आहेत, ज्यांचा राजकारणावर मोठा प्रभाव आहे. आपल्या भाषणाने, भूमिकेने आणि रणनीतीने ते राजकारण फिरवू शकतात. (Supriya Sule, Rashmi Thackeray, Yashomati Thakur can turn Maharashtra politics around)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीवर पाहुया, पॉलिटिकल क्लाऊट असणाऱ्या, महाराष्ट्राच राजकारण फिरवण्याची क्षमता असणाऱ्या टॉप फोर महिला नेत्या…

या यादीत सगळ्यात पहिले नाव येते ते खासदार सुप्रिया सुळे यांचे :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या अशी सुप्रिया सुळे यांची पहिली ओळख. पण या ओळखीच्या पलिकडे जात सुप्रिया सुळे यांनी आज घडीला महाराष्ट्रात स्वतःची स्वतंत्र ओळख तयार केली आहे, हे मान्य करावेच लागते. 2007 साली राज्यसभेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या संसदीय प्रवासाला सुरुवात झाली. 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 असे सलग चारवेळा त्या बारामती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

वडील शरद पवार आणि मोठा भाऊ अजित पवार राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना राजकीय बाळकडू मिळाले. पण मिळालेले बाळकडू कसे आणि कुठे वापरायचे याचे ज्ञान मात्र त्यांनी प्राप्त केले आहे. बारामतीसह पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे बारामतीतील एखाद्या स्थानिक प्रश्नापासून राज्यपातळीच्या विषयावर आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्या संसदेमध्ये सहजेतेने पण मोठ्या तडफेने भाषण करतात. सुप्रिया सुळे यांना संसदेमधील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी, भाषणासाठी आणि उपस्थितीसाठी संसदरत्न आणि संसद महारत्न असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडिलांना खंबीरपणे साथ दिली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा आणि यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ जागा निवडून येण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा सिंहाचा वाटा आहे. बारामतीसह त्यांनी संपूर्ण राज्यात उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या. थोडक्यात शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली सुप्रिया सुळे नावाचे रोपटे खुरटले नाही. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

रश्मी ठाकरे :

माजी मुख्यमंत्री, शिवसेनाप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या राजकारणात कोणत्याही पदावर नाहीत. मात्र तरीही त्या कधी पडद्यामागे राहुन उद्धव ठाकरे यांना राजकीय रणनीती बनविण्यात मदत करतात. तर कधी समोर येऊन राजकारणात प्रचाराच्या व्यासपीठावरही दिसतात. रश्मी ठाकरे राजकारणात कधी सक्रिय झाल्या हे सांगता येत नाही. मात्र 2000 सालानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष दौऱ्यावरही जाऊ लागल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसू लागल्या होत्या.

पुढच्या दशकात रश्मी ठाकरे अधिकच सक्रिय झाल्या. 2010 साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी त्या प्रचारात दिसल्या होत्या.  शिवसेना महिला नेत्यांनी आयोजित केलेल्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये रश्मी ठाकरे उपस्थित राहतात. काही ठिकाणी व्यासपीठांवरुन भाषण करतानाही दिसतात. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत होत्या. अगदी त्यांचा अर्ज भरण्यापासून बहुतांश प्रचारही रश्मी ठाकरेंनी केला होता. नंतर विजयी प्रमाणपत्र स्वीकारतानाही त्या सोबत होत्या.

रश्मी ठाकरे निर्णयप्रक्रियेत कशा असतात, याचे एक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 2019 मध्ये शिवसेना-भाजपची दिलजमाई नेमकी झाली कशी? त्या दिलजमाईचे स्क्रीप्टरायटर कोण होते? असा प्रश्न एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले, मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनी जो वडा आम्हाला खाऊ घातला, साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही. विषयच संपला. त्यावर सर्व हसले. पण राजकीय जाणकारांना मिळायचा तो संदेश मिळाला.

शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा सेनेशी संबंधित राजकीय घडामोडी असो, प्रत्येकवेळी रश्मी ठाकरे या ‘महत्त्वाचा रोल प्ले’ करतात,  हे नक्की. रश्मी ठाकरे यांची राजकीय महत्वकांक्षा काय आहे याबाबत कधीही खुलेपणाने बोलले गेलेले नाही. पण अलिकडेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी कलानगर परिसरात रश्मी ठाकरे यांच्यापुढे भावी मुख्यमंत्री असे लिहिल्याचे बॅनर्स झळकले होते. त्यामुळे रश्मी ठाकरे याही मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आल्याचे बोलले गेले.

या यादीत तिसरे नाव घ्यावे लागते ते यशोमती ठाकूर यांचे.

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या मुळच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुकुंज मोझरी या गावाच्या. त्यांचे वडील भैय्यासाहेब ठाकूर दोन टर्म आमदार होते. पण यशोमती ठाकूर यांचा राजकारणात येण्याचा मनोदय कधी नव्हता. त्यांचा शालेय जीवनापासूनच एनसीसीकडे ओढा होता. 26 जानेवारीला राजपथवर होणारी प्रतिष्ठीत आरडी परेडही त्यांनी केली आहे. त्या शूटिंगमधील गोल्ड मेडलिस्ट आहेत. सहाजिकच त्यांचा ओढा आर्मी, एअरफोर्स अशा सुरक्षा दलांमध्ये जाण्याचा होता. मात्र महाविद्यालयीन शिक्षण संपताच काही दिवसांत ताईंचे लग्न झाले. पण अवघ्या काही वर्षातच त्यांच्या वैयक्तिक जीवनात मोठी हानी झाली. पती राजेश सोनावणे यांचे निधन झाले. पण ताईंनी हार न मानता दोन मुलांना सोबत घेत संघर्ष सुरु केला.

2004 साली तिवसा मतदारसंघातून भैय्यासाहेब ठाकूर यांच्या ऐवजी काँग्रेसने यशोमती ठाकूर यांना तिकीट दिले. त्यावेळी अवघ्या काही हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. पण यशोमती ठाकूर यांनी मागे न फिरता संघटनेचे काम सुरु केले. तिवसा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी पक्की केली. मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. खरंतर आक्रमकपणा हा काही काँग्रेस बाणा नाही. पण यशोमती ठाकूर यांनी आक्रमक शैलीने विदर्भातील राजकारणच आपल्याभोवती फिरते ठेवले. पक्षानेही ठाकूर यांना ताकद दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली. त्यांना राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली.

2009, 2014 आणि 2019 असे सलग तीनवेळा मोठ्या मताधिक्याने विजयी होत यशोमती ठाकूर यांनी विधानसभा गाठली. 2014 मध्ये तर त्या विदर्भातील एकमेव महिला आमदार होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत होत्या. ठाकूर यांनी राणा यांना तिवसा मतदारसंघातून आघाडी मिळवून तर दिलीच. पण जिल्ह्यात राणा यांच्या प्रचार यंत्रणेची सर्व काळजीही घेतली. त्यामुळेच संबंध राज्यात आघाडीचे पानिपत झाले असताना यशोतमी ताईंनी एका अपक्ष उमेदवाराला निवडून आणले. यातून काँग्रेसच्या एक आमदार किती पॉवर फुल्ल आहेत, हे त्यांनी दाखवून दिले.

2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका पत्रावर यशोमती ठाकूर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली. त्यामुळे काँग्रेस हायकमांडशीही त्यांचे किती निकटचे संबंध आहेत, याचा अंदाज येऊ शकतो. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. त्यामुळे ताईंचेही मंत्रिपद गेले. पण त्यानंतरही यशोमती ठाकूर यांनी जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरत अनेकदा विधानसभा दणाणून सोडल्याचे पाहायाला मिळाले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी कामगिरी चोख बजावली आहे. काँग्रेसच्या बळवंत वानखडे निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी ठाकूर यांच्याच खांद्यावर होती. ज्या राणांनी निवडून आल्यानंतर बाजू बदलत जनमताचा अनादर केला त्यांना यंदा घरी बसवायचेच असा चंग त्यांनी बांधला होता. त्यासाठी राणा विरोधकांची एकी घडवून आणत यशोमती ठाकूर यांनी रणनीती आखली. देशात गाजलेल्या या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. यात तिवसा मतदारसंघातूनही वानखडे यांना 10 हजार मतांची भक्कम आघाडी आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचाच होल्ड आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर आज तरी भक्कम स्थितीमध्ये आहेत.

सध्या यशोमती ठाकूर काँग्रेस सर्वोच्च अशा वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्या आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचीही जबाबदारी होती. अमरावतीसोबत शेजारच्या अकोला, वर्धा या जिल्ह्यांच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आपल्यासोबच काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्याची ताकदही यशोमती ठाकूर बाळगून आहेत. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासूनच राजकीय संघर्ष करत त्या आज काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्या बनल्या आहेत. वडिलांच्या छायेतून बाहेर येत यशोमतीताईंनी त्यांचे स्वतःच एक वलय तयार केले आहे. आज त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री म्हणून घेतले जाते. थोडक्यात पुरुषसत्ताक वर्तुळात त्यांनी स्वत:चे नेतृत्त्व सिद्ध केल्याचे दिसते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube