MLC Pradnya Satav यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

MLC Pradnya Satav यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांकडून अटक

हिंगोली : दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला अटक केली असून महिंद्र असं या हल्लेखोराचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कळमनुरी (Kalamnuri) येथील कसबे धवंडा (Kasbe Dhawanda) गावात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला होता. याबाबतची माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत दिली. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता…
कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. महिला आमदारावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहणार. कारण माझे पती दिवंगत नेते राजीव सातव यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता.

हल्लेखोरांना इशारा
या भ्याड हल्ल्यातून बचावल्यानंतर आमदार प्रज्ञा सातव यांनी हल्लेखोरांना थेट इशारा दिला आहे. सातव म्हणाल्या, समोरून लढा भ्याड हल्ले करू नका. हल्लेखोराने अंगरक्षक बाजूला असताना पाठीमागून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पती गेल्यानंतर माझ्या कुटुंबात कर्ती-धर्ती मीच आहे.या घटनेची माहिती पोलिसांना दिली असल्याचं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे घातले आहे. माझी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की तातडीची बाब म्हणून प्रज्ञा सातव यांना सुरक्षा द्यावी. या प्रकरणाची कसून चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे, अशी मागणी सुळे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube