Uddhav Thackeray Criticize Devendra Fadanvis for his old letter on wet drought : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक शेतकऱ्यांची पिकं पुर्णत: वाहून गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं जुनं पत्र वाचून दाखवत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला आहे. या पत्रात फडणवीस यांनी राज्य सरकारला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता याच पत्राचा दाखला देत ठाकरे यांनी देखील सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली आहे.
माणसं पदांनुसार शब्द बदलतात. कारण माझ्याकडे मी मुख्यमंत्री असतानाचं तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये परतीच्या पावसाने राज्यात झालेल्या नुकसानीवर केवळ घोषणा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने थेट मदत करा. असं म्हटलं गेलं होतं. तसेच त्यावेळी त्यांनी आमची नियत काढली गेली. आता मात्र मुख्यमंत्री अभ्यास करत आहेत. पंतप्रधानांची भेट घेत आहेत. मात्र अद्यापही केंद्राचं पथक राज्यात पाहणी करण्यासाठी आलेलं नाही. ही पाहणी कधी होणार शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? त्यामुळे ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा पण शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.
मात्र यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. ओला दुष्काळ आतापर्यंत कधी जाहीर झालेला नाही. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती, उपायोजना केल्या जातात. तशाच प्रकारच्या सवलती दुष्काळी टंचाई पडली आहे, असं समजून यावेळी सुद्धा सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.