तुम्ही कोणत्या मतदारसंघातून लढणार? जरांगे म्हणाले, ‘माझ्यासाठी मतदारसंघच…’
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवण्याची घोषणा केली. त्यामुळं महायुती (Mahayuti) आणि मविआमधील घटक पक्ष धास्तावले. दरम्यान, जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणुक लढवणार याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. यावर आता जरांगेंनी भाष्य केलं.
‘भोर’मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका; शंकर मांडेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
मराठा, मुस्लीम एकत्र आला पाहिजे…
मनोज जरांगेंनी आज अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, समीकरणं जुळणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आमचे समीकरणं जुळवणे सुरू आहेत. एका जातीवर निवडणुका लढवल्या जात नाहीत. या देशात अशा पद्धतीने कोणीही निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळं मराठा, मुस्लीम, दलित एकत्र यायला पाहिजे, मग राज्यभर शंभर टक्के परिवर्तन होऊ शकतं, असं जरांगे म्हणाले.
पुढं ते म्हणाले, राज्यातील बांधवाना कालच सांगितलं की, तुम्ही इकडे गर्दी करू नका. गर्दी जमली की परिवर्तन होतं असं नाही. तुम्ही इकडे गर्दी केली मला काही काम सुचत नाही. अंतरवलीत 29 तारखेपर्यंत येऊ नका. मला निर्णय प्रक्रिया पूर्ण करू द्या. येत्या 30 तारखेला बैठक असून या बैठकीत काय होतं हे बघू. असं जरांगे म्हणाले.
मला मतदारसंघच शिल्लक नाही…
तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवाल? असा प्रश्न केला असता जरांगे म्हणाले की, सध्या इतके भावी आमदार झालेत. मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही, अशी मिश्कील टिप्पणी जरांगेंनी केली.
जरांगेंची अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी भेट घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मी सहा कोटी मराठा समाजाची नाराज करणार नाही. सहा कोटी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही, असं जरांगे म्हणाले.
उपसरपंचाचा करेक्ट कार्यक्रम करणार…
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मोठे साहेब तिथे बसले आहेत. उपसरपंचाच्या हातात सगळं आहे. पण, यावेळेस उपसरपंचाचा करेक्ट कार्यक्रम शेतकरी करणार आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.