Lok Sabha Election : .. तर ती माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू
Lok Sabha Election: सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महाविकास आघाडीकडून (MVA) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंड करत आज अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले.
या सभेत विशाल पाटील म्हणाले, 1917 मध्ये वसंतदादाचा जन्म झाला आणि 1919 मध्ये वसंतदादांचे छत्र हरपलं. त्यानंतर त्यांना लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला. तरुणपणात दादांना काँग्रेस सापडली, काँग्रेसनं त्यांना घडवलं. यामुळे वसंतदादा घराण्याचं काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे.
मी 1999 पासून काँग्रेस पक्षाचा काम करतो. मी माझ्या वडिलांना खासदार म्हणून पाहिलं आहे. प्रत्येक घरातील पोराला आपल्या बापासारखं झालं पाहिजे, असं वाटतं. तसे मलाही वाटतं. वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? आजोबा आणि वडिलांसारखं झालो, तर ती माझी चूक आहे का? मी स्वार्थासाठी लढत नाही, असं म्हणताना विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले.
मला 2002 मध्ये जिल्हा परिषदेवर जायचं होतं मात्र पक्षातील वरिष्ठांनी घराणेशाही होईल असं सांगितले त्यामुळे मी तेव्हा थांबलो, 2005 मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर मी उभारलं पाहिजे, असं वाटत होते. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मी तक्रार केली नाही. लोकं म्हणाली थांबा आणि कामाला लागा… तेव्हा मी सगळ्यात पुढे पळत होतो. जेव्हा, जेव्हा काँग्रेसनं थांबा म्हटलं, तेव्हा मी थांबलो, असंही ते यासभेत म्हणाले.
2019 मध्ये सगळे म्हणत होते, मी उभारलं पाहिजे, तेव्हा पक्षानं जागाच सोडून दिली. मला दुसऱ्या पक्षातून उभे राहायला सांगितलं. पक्षावर एकतर्फी प्रेम असल्यानं मीसुद्धा दुसऱ्या चिन्हावर लढतो. पण, पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो असं विशाल पाटलांनी म्हटलं.
विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसला सांगलीची जागा सुटावी यासाठी अनेक प्रत्यन केले होते मात्र ठाकरे गटाकडून या जागेवर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.