सुजय विखेंच्या वक्तव्यापासून शेतकरी प्रश्नांपर्यंत; विवेक कोल्हेंनी मांडली आपली सविस्तर भूमिका

अधिवेशनातील अनुभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारच्या धोरणांबाबतची भूमिका तसेच विखे-कोल्हे संघर्षाच्या चर्चांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

  • Written By: Published:
Untitled Design 68

Vivek Kolhe presented his detailed stance : अहिल्यानगर मतदारसंघातून प्रथमच विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार विवेक कोल्हे यांनी पहिल्याच अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवला. अधिवेशनातील अनुभव, शेतकऱ्यांचे प्रश्न, सरकारच्या धोरणांबाबतची भूमिका तसेच विखे-कोल्हे संघर्षाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. पहिल्या अधिवेशनाकडे आपण शिकण्याची संधी म्हणून पाहत असल्याचे सांगत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष कायम राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. हे माझं पहिलंच अधिवेशन असून या माध्यमातून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळत आहे. अधिवेशनात तारांकित प्रश्न 45 दिवस आधी द्यावे लागतात. मात्र, माझी निवड नुकतीच झाल्याने ते शक्य झाले नाही. तरीही उपलब्ध वेळेत सर्व प्रक्रिया समजून घेत जनतेचे विविध प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याची ग्वाही आपण यापूर्वीही दिली असून मतदारसंघाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुभव नसतानाही अध्यक्ष आणि सभापतींकडे विनंती करून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही वडिलांप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून झाली, याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या आमदारांच्या सत्कार समारंभात माजी खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, सुजय विखे यांनी जाहीर भाषणात तुम्ही जे पद भोगत आहात ते आम्ही दोन महिन्यांपूर्वी सोडून दिले आहे असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आपण त्यांचे मोठ्या भावाच्या नात्याने जाहीर आभार मानले. तसेच ज्यांनी आपल्याला ही संधी दिली, त्यांचेही आभार व्यक्त केले.

सत्कार समारंभातील आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना कोल्हे म्हणाले की, त्यावेळी आपण भावनेच्या भरात बोललो होतो. जब मै घायल होता हू तब मै घातक होता हू, या आशयाचे वक्तव्य केले होते. हा सर्वपक्षीय सत्कार समारंभ होता. त्यामध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते. अनेक संकटांचा सामना करत आपण या पदापर्यंत पोहोचलो असून त्यामुळे या पदाची जबाबदारी आणि जाणीव पूर्णपणे असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या शेतीतील योगदानाला कायदेशीर मान्यता; महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर

विखे-कोल्हे संघर्षाच्या चर्चांवर बोलताना कोल्हे यांनी स्पष्ट केले की, आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. जनतेची कामे अडवली गेली तर यापुढेही आम्ही संघर्ष करू. मात्र, कोणाविषयीही वैयक्तिक आकस नाही. पक्षाच्या आशीर्वादाने मोठ्या पदावर बसलेल्या लोकांची सर्वांना समान न्याय आणि समान निधी देण्याची नैतिक जबाबदारी असते, असे त्यांनी म्हटले.

सरकारच्या धोरणांबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे. पुरवणी मागण्यांमध्ये 22 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शेतमालाला मिळणारा नफा अद्याप तुटपुंजा आहे. शेतमालाला अधिक चांगला भाव मिळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. केवळ कर्जमाफी पुरेशी नाही, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बळकट होणे आवश्यक आहे.

विखे-कोल्हे संघर्षाच्या चर्चांवर पूर्णविराम देताना विवेक कोल्हे म्हणाले की, संघर्ष असेल तर तो संपुष्टातही येईल. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे ही आमची भूमिका आहे. त्याचा अर्थ वैयक्तिक संघर्ष असा होत नाही. विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. ज्येष्ठांनी युवा पिढीला समजून घ्यावे, हीच अपेक्षा आहे. त्यांची आणि माझी तुलना होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us