Ground Zero : वैजापूरमध्ये रमेश बोरणारे सुसाट… ठाकरे अद्यापही उमेदवाराच्याच शोधात

  • Written By: Published:
Ground Zero : वैजापूरमध्ये रमेश बोरणारे सुसाट… ठाकरे अद्यापही उमेदवाराच्याच शोधात

“2019 ला पैसे देऊन उमेदवारी देण्याचा घाट उद्धव ठाकरे यांनी घातला होता. शेवटी मी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना भेटलो. मी 15 केसेस अंगावर घेतल्यात. तेव्हा मला तिकीट मिळाले” शिवसेना (Shivsena) आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांचे हे आरोप. शिवसेनेत बंड होऊन अडीच वर्षे झाली. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच्या आमदारांकडून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) होणारे आरोप-प्रत्यारोप थांबत नाहीत. तसे बोरणारे हे पहिल्याच टर्मचे आमदार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे तीन-तीन, चार-चार टर्मचे आमदार उद्धव ठाकरे बाबत बोलून आणखी नाराजी ओढावून घेणे टाळत आहेत. पण बोरणारे ठाकरे यांना थेट आव्हान देत आहेत.

बोरणारे यांच्या या धाडसाचे उत्तर दडले आहे वैजापूर मतदारसंघातील सद्यस्थितीमध्ये. वैजापूर मतदारसंघातून लोकसभेला शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांना 37 हजारांचे लीड आहे. शिवाय डोक्यात असलेले दोन उमेदवार ऐनवेळी मागे हटले. त्यामुळे बोरणारेंविरोधात उद्धव ठाकरेंकडे बडा चेहराच नाही. हेच बोरणारे यांच्या आत्मविश्वासाचे कारण असल्याचे बोलले जाते. बोरणारे यांच्यावर ठाकरेंचा प्रचंड राग आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कोणता चेहरा मैदानात उतरायचा, याची रणनिती सध्या उद्धव ठाकरेंकडून आखली जात आहे. कोण असू शकतात, ठाकरेंच्या रणनीतीतील हे संभाव्य उमेदवार? (Who will be the candidate from Shiv Sena UBT party against Ramesh Borner of Shiv Sena in Vaijapur Assembly Constituency)

पाहुया लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमधून…

वैजापूर हा तसा एकेकाळी काँग्रेसचा भक्कम बालेकिल्ला होता. 1962 मध्ये गिरीजाबाई जाधव, 1967 मध्ये विनायकराव पाटील, 1969 मध्ये गंगाधर दगडू पाटील इथून आमदार झाले. 1980 मध्ये तर थेट श्रीरामपूरपच्या गोविंदराव आदिक यांनाच वैजापूरकरांनी निवडून दिले होते. 1985 मध्ये समाजवादी काँग्रेसकडून रामकृष्ण पाटील आमदार झाले. पुढे 1990 मध्ये पुन्हा रामकृष्ण पाटील हे काँग्रेसकडून निवडून आले. तर 1995 मध्ये काँग्रेसकडून कैलास आबा पाटील चिकटगावकर हे आमदार झाले. त्या निवडणुकीत रंगनाथ मुरलीधर वाणी हे समाजवादी काँग्रेसकडून मैदानात उतरले होते. पण त्यांचा निभाव लागला नाही. त्यावेळीपर्यंत मराठवाड्यातील बहुतांश जागांवर शिवसेनेने भगवा फडकवला होता. पण वैजापूरमध्ये सेनेला विजयापर्यंत जाता येत नव्हते.

पुढच्याच निवडणुकीत रंगनाथ मुरलीधर वाणी शिवसेनेत गेले. तर कैलास आबा चिकटगावकरांनी राष्ट्रवादीची वाट धरली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मतविभागणीचा शिवसेना-भाजप युतीला फायदा झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कैलास पाटील यांचा धुव्वा उडवत अखेरीस वैजापूर शिवसेनेने काबीज केलेच. त्यानंतर सेनेने वायुवेगाने मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भगवा फडकवला. 2004 मध्ये वैजापूर मतदारसंघ काँग्रेसला सुटला. काँग्रेसकडून भाऊसाहेब ठोंबरे यांना उमेदवारी मिळाली. तर कैलास आबांचे धाकटे बंधू भाऊसाहेब चिकटगावकर अपक्ष रिंगणात उतरले. या मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा वाणी यांना झाला. 2009 मध्ये तर कैलासआबा पाटील चिकटगावकर, भाऊसाहेब चिकटगावकर या दोघांनीही बंडखोरी केली. काँग्रेसकडून दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळाली. निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. यात केवळ एक हजारांहून अधिक मताने वाणी हे निवडून आले होते.

सत्तारांची नजर चौथ्या विजयावर; पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग

2014 मध्ये वाणी यांनी त्यांच्या जागी रमेश बोरणारे यांच्या नावाची शिफारस केली. पण सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने बोरणारे यांना थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या. अनुभवी शिलेदार म्हणून पुन्हा एकदा वाणी यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपकडून एकनाथ जाधव तर काँग्रेसकडून पुन्हा एकदा दिनेश परदेशी यांना संधी मिळाली. राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब चिकटगावकर यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. चिकटगावकरांक़डे जिल्हा परिषदेसह, पंचायत समिती आणि नगरपालिका ताब्यात होती. थोरले बंधू कैलास पाटील चिकटगावकर यांच्याशी दिलजमाई झाली. नेत्यांचा जम्बो फौजफाटा मतदारसंघात उतरवत विजयाची फिल्डिंग लावली. चिकटगावकर बंधूंच्या वर्चस्वाला तडा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव हे शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर रिंगणात उतरले होते. पण चिकटगावकर यांच्याबाजूने समीकरणे परफेक्ट बसली. शिवसेना-भाजप युतीच्या मतविभागणीत चिकटगावकर 4 हजार 700 मतांनी निवडून आले.

2019 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून दोनवेळा विधानसभा लढलेल्या दिनेश परदेशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मतदारसंघ भाजपकडे घ्यायचा आणि स्वतः उमेदवारी करायची असे त्यांचे मनसुबे होते. पण निवडणूक आली तरी मतदारसंघ भाजप लढणार की शिवसेना लढणार हे स्पष्ट नव्हते. अखेरीस शिवसेनेने औपचारिक घोषणेपूर्वीच वैजापूरची उमेदवारी रमेश बोरणारे यांना जाहीर झाली. त्याचवेळी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि अभय पाटील या काका-पुतण्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू झाला. मात्र राजकारणामुळे कुटुंबात अंतर्गत कलह नको म्हणून काकांनी मोठेपणा दाखवत माघार घेतली. राष्ट्रवादीकडून अभय पाटील यांना उमेदवारी मिळाली. पण बोरणारे यांनी अभय पाटील यांचा तब्बल 50 हजार मतांनी पराभव करत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला. बोरणारे यांना 98 हजार 183 मते होती. तर अभय पाटील यांना अवघे 39 हजार मते मिळाली.

भुमरेंच्या किल्ल्याला सुरुंग लागणार? जुन्या शिलेदाराला ठाकरेंची ताकद

आता मागच्या दोन वर्षात मतदारसंघातील गणिते बदलली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर बोरणारे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. तर महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र लक्षात घेत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वाट धरली. यंदा लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये उमेदावर संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरणारेंना गद्दारीच्या शिक्क्याचा, महायुतीबद्दलच्या नाराजीचा फटका बसेल असे चित्र होते. पण भुमरे यांना मराठा असल्याचा फायदा झाला. तर सत्तेचा फायदा उचलत आणलेल्या भरघोस निधीने बोरणारे यांच्याबद्दलचा रोष कमी झालेला दिसला. याचाच परिणाम म्हणून भुमरेंना 37 हजारांचे लीड मिळाले. सगळ्याच राजकीय पक्षांना लोकसभेतील चित्र विधानसभा निवडणुकीत नसले याची कल्पना आहे. त्यामुळे वैजापूर मतदारंसघ राखताना विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची दमछाक होऊ शकते.

महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे जाईल हे निश्चित मानले जाते. पण ठाकरेंकडून उमेदवाराचा शोध अद्यापही सुरुच आहे. मागील आठवड्यापर्यंत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे नाव निश्चित मानले जात होते. पण दिनेश परदेशी यांचा प्रवेश निश्चित होताच चिकटगावकर यांनी काळाची पावलं ओळखत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. चिकटगावकर कुटुंबातील अंतर्गत संघर्षाचा फटका बसू नये म्हणून, दिनेश परदेशी यांना भाजपमधून आयात करुन त्यांना उमेदवारी देण्याचे ठाकरे यांच्या मनात होते. पण भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष घालून परदेशी यांना थांबवल्याचे बोलले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे वैजापूरमध्ये येऊनही परदेशी यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमचा विचका झाला.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे वैजापूरमध्ये नवीन उमेदवाराच्या शोधात आहेत. यात माजी पंचायत समिती सभापती आणि उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, माजी आमदार रंगनाथ मुरलीधर वाणी यांचे पुत्र आणि तालुकाध्यक्ष सचिन वाणी आणि अमोल अन्नदाते असे तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. अमोल अन्नदाते हे सध्या तरी स्वत: राजकारणात नाहीत. त्यांच्या आई आनंदीबाई अन्नदाते या गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. त्या वैजापूरच्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. शिवाय वैजापूर शहरसंपर्कप्रमुख आहेत. शिक्षणसंस्था चालवत असलेल्या मुलासाठी तिकीट मागत आहेत. त्यामुळे सध्या तरी या तीनपैकी एका चेहऱ्याची निवड ठाकरेंना करायची आहे. तिसऱ्या बाजूला माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे अपक्षही रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते. आता या मतविभागणीचा फायदा कोणाला होणार? आणि कोणाचा कार्यक्रम होणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube