ॲग्रीस्टॅकची नगर जिल्ह्यात भरारी; तब्बल 7 लाख शेतकऱ्यांची नोंदणी

AgriStack Scheme in Ahilyanagar : शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणाऱ्या ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेला (AgriStack Scheme) अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 13 लाख 35 हजार 12 शेतकऱ्यांपैकी 7 लाख 20 हजार 171 शेतकऱ्यांनी या योजनेत ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. यामुळे 52.45 टक्के काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या मोहिमेत शेवगाव तालुक्याने शेतकरी संख्येच्या तुलनेत सर्वाधिक 49,857 शेतकऱ्यांची नोंदणी करून (75.88 टक्के) जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही ही मोहीम जोमाने सुरू आहे. शेतकऱ्यांकडूनही योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरगावमध्ये 39,191 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली (65.46 टक्के), श्रीरामपूरमध्ये 29,380 (63.60 टक्के), नेवासा 72,648 (59.69 टक्के) आणि राहुरी 49,333 (56.80 टक्के) शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे, कर्जत तालुक्यात 50,730 (55.66 टक्के), राहाता 36,262 (54.66 टक्के), जामखेड 41,548 (50.49 टक्के), अकोले 43,139 (49.17 टक्के), संगमनेर 75,165 (49.29 टक्के), पाथर्डी 55,047 (48.70 टक्के), पारनेर 67,451 (53.19 टक्के), अहिल्यानगर 46,435 (39.07 टक्के) आणि श्रीगोंदा तालुक्यात 63,985 (55.15 टक्के) शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर वाढवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रासह देशातील 24 राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा आहे.
भारीच! देशातील तब्बल 6 कोटी शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; यूपी अन् महाराष्ट्राची आघाडी
‘अॅग्रीस्टॅक’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या डिजिटल ओळखपत्रामुळे अनेक फायदे होणार आहेत. यात प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ अधिक जलद व सुलभ होईल, शेतकऱ्यांसाठी कर्ज प्रक्रिया वेगवान होईल आणि त्यांना शेतीविकासासाठी अधिक सहाय्य मिळेल. यासोबतच, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळेल, सरकारी कार्यालयांना वारंवार भेटी न देता डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल आणि शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती तात्काळ मिळणार आहे. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे सुलभ होईल. तसेच किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल.
‘अॅग्रीस्टॅक’ ओळखपत्रासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्र, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करता येते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया अवघड वाटते, त्यांच्यासाठी गावपातळीवर महसूल विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या सातबारा उताऱ्याबरोबर जोडण्यात येऊन त्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत मोफत नोंदणी करण्यात येत आहे.
येवल्यात शेतकरीच स्वातंत्र्यदिनी करणार कर्जमुक्तीची घोषणा; भागवतराव सोनवणे